सोयाबीन, कापूस उत्पादकांना सानुग्रह अनुदान
esakal September 21, 2024 02:45 AM

माळशिरस, ता. २० : राज्य सरकारने पीक पाहणी अभावी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहिलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादकांना दिलासा दिला आहे. सातबारावरील नोंदीच्या आधारावर देखील या दोन्ही पिकांच्या उत्पादकांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

‘सकाळ’ने ‘पीक पाहणी नोंदणी अभावी सानुग्रह अनुदानापासून सोयाबीन उत्पादक वंचित’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची व शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत महसूलचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नुकतेच परिपत्रक काढले. त्यानुसार तलाठ्यांनी ई पीक नोंद नसणाऱ्यांची गाव नमुना १२ वरून सातबाऱ्यावर सोयाबीन, कापसाची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करून कृषी सहाय्यक यांना यादी दिली.

मागील २०२३ वर्षासाठी शासनाने सोयाबीन व कापूस या पिकासाठी हेक्टरी ५००० रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून जाहीर केले होते मात्र हे अनुदान सोयाबीन व कापूस उत्पादकांना मिळण्यासाठी त्यांच्या घेतलेल्या या दोन्ही पिकांचे सातबारा वरती पीक पाहणी मध्ये नोंद असणे गरजेचे असल्याची अट ठेवण्यात आलेली होती.
मागील वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन व कापूस उत्पादकांना शासनाने मदत करावी, अशी सोयाबीन व कापूस उत्पादकांची अपेक्षा होती.


शासनाच्या परिपत्रकानुसार महसूल विभागाकडून येणारी यादी निश्चित करून सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी व निकषानुसार कोणी वंचित राहणार नाही याचा प्रयत्न केला जाईल.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर

सानुग्रह अनुदानाची रक्कम देताना ती अत्यंत कमी प्रमाणात आहे. असे असतानाही शासनाच्या यापूर्वीच्या नियमाने आम्ही अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहत होतो. आता सातबारा वरील सोयाबीन व कापूस नोंद गृहीत धरून सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याने निश्चितपणे बहुतांश शेतकरी सानुग्रह अनुदानाच्या लाभास पात्र होतील.
- हनुमंत सोळसकर, सोयाबीन उत्पादक

२०२३ मधील तालुका निहाय सोयाबीन आकडेवारी हेक्टरी
तालुका.......हेक्टरी क्षेत्र
हवेली.......६०६
मुळशी.......३१०
भोर.......२९३०
मावळ.......४७२
वेल्हे.......५३
जुन्नर.......१३२३७
खेड.......१७१४९
आंबेगाव.......४८५२
शिरूर.......२२१२
बारामती.......६५५
इंदापूर.......२२०
दौड.......३२०
पुरंदर.......१९०५


४४९२० हेक्टरवर सोयाबीनचे पीक
जिल्ह्यात २०२३ वर्षांमध्ये कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कापूस १५५६ हेक्टर (३८९० एकर) क्षेत्रावर घेतला गेलेला आहे. मात्र जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून सोयाबीन पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल वाढलेला असल्याने २०२३ या वर्षांमध्ये जिल्ह्यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार

४४९२० हेक्टरवर म्हणजे एक लाख बारा हजार तीनशे एकरावर सोयाबीन हे पीक घेण्यात आले आहे.

47989

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.