Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालण्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा बांधवांनी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आंतरवाली सराटी येथे दाखल व्हावे असे आवाहन देखील मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सलग सहाव्यांदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या 4 दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. चार दिवसांपासून त्याच्या पोटात पाणी आणि अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना उभे राहणे देखील कठीण होत आहे. जरांगे यांची ही परिस्थिती पाहून महाराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाकडून शनिवारी बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.