मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत यंदाच्या निवडणुकीतील निकालाचा अंदाज सांगणं चांगलंच कठीण बनलं आहे. कारण, पहिल्यांदाच तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येऊन महायुती व महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. त्यामध्ये, दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. त्यामुळे, पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारही विभागले गेले आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा अंदाज घेता महाविकास आघाडीचे पारडे जड दिसते. मात्र, लाडकी बहीण योजना, योजनांचा पाऊस आणि सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीचं पारडं जड वाटतं. त्यामुळे, या निवडणुकांचा राजकीय अंदाज येत नाही. मात्र, आयएनएनएस माध्यम समुहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्वेक्षणातून राज्यात कोणाचं सरकार येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची चिन्हे दिसून येतात.
आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाच्या सर्वेक्षण अंदाजानुसार, राज्यातील 288 मतदारसंघांचा विचार केल्यास राज्यात महायुतीचं पारडं जड दिसून येत आहेत. त्यानुसार, राज्यात 145 ते 165 जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला विजय मिळू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, महायुतीचं पारड जड असून महायुतीचच सरकार पुन्हा येऊ शकतं,असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीला 106 ते 126 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, राज्यात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता सर्वेक्षणातून दिसून येत आहे. तसेच, इतर राजकीय पक्ष किंवा अपक्षांना एकत्रित धरुन केवळ 5 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज दर्शविण्यात आला आहे. राजकीय सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी 23 नोव्हेंबर रोजीच अंतिम चित्र स्पष्ट होणार हेही तितकेच खरे.
या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी 31 ते 38 जागांवर महायुतीला यश मिळू शकते. तर, महाविकास आघाडीला 29 ते 32 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. विदर्भातील 62 जागांवरही महायुतीचं पारडं जड असून 32 ते 37 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला 21 ते 26 जागांवर यश मिळू शकते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या मराठवाड्यातही 46 पैकी 18 ते 24 जागांवर महायुतीला यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पारडं जड असून येथे मविआला 20 ते 24 जागा मिळू शकतात. ठाणे आणि कोकणातील 39 जागांपैकी 23 ते 25 जागा महायुतीला मिळू शकतील. तर, 10 ते 11 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल, असा अंदाज आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 21 ते 26 जागांवर महायुती आणि 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा सर्वेक्षणातून अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांवपैकी 14 ते 16 जागांवर महायुतीला यश मिळेल, आणि 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे, राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता या ओपिनियन पोलमधून दिसून येते.
आयएनएस आणि मॅट्रीझ पोलच्या सर्वेक्षणातून 47 टक्के मतदान महायुतीच्या पारड्यात पडू शकते. तर, महाविकास आघाडीच्या पारड्यात 41 टक्के मतदान पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर पक्षांसाठी केवळ 12 टक्के मतदानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.