स्थळ : वणीजवळ कुठेतरी. वेळ : धामधुमीची.
तपास अधिकारी : (भीतभीत पुढे येत) यात्रियों से निवेदन है की कृपया अपनी सामान की जाँच कराएं!!
उधोजीसाहेब : (मागे वळून) हे बघा रे…तुमच्या बॅगा तपासणार म्हणे!!
तपास अधिकारी : (कर्तव्यकठोरपणाने) तुमचीच बॅग तपासायची आहे साहेब! कृपया सहकार्य करा!
उधोजीसाहेब : (संतापून) ही हिंमत? ही जाँच आहे की जाच, आँ? महाराष्ट्रात आमची बॅग उघडणारा अजून पैदा झालेला नाही!!
तपास अधिकारी : सात डिसेंबर १९७६ ला पैदा झाला साहेब!
उधोजीसाहेब : (भिवई चढवत) कोण तो?
तपास अधिकारी : माझा वाढदिवस आहे साहेब!! बॅगा उघडा!!
उधोजीसाहेब : (बॅग समोर आपटत) तुम्हीच उघडा आणि तुम्हीच बघा! कळतात मला ही सगळी नाटकं! माझा अपमान करण्याचा हा कट आहे! पण महाराष्ट्राची जनता याचा सूड घेईल!!
तपास अधिकारी : (विनम्रपणे बॅग उघडत) व्हीआयपी वाटतं!!
उधोजीसाहेब : (चिडून) हो! तरीही करताय ना तपासणी?
तपास अधिकारी : बॅग व्हीआयपी आहे, असं म्हटलं मी!!
उधोजीसाहेब : (कॅमेरा सरसावत) मी या तपासणीचं शूटिंग करणार!
तपास अधिकारी : (कपडे ठीकठाक करुन स्माइल देत) थँक्यू!
उधोजीसाहेब : (संतापातिरेकानं) लग्नाचा व्हिडिओ काढत नाहीए! पोट आत घेऊन काय उभं राहताय? नॉन्सेन्स!! बॅगा तपासा!!
तपास अधिकारी : (बॅगेतून एकेक वस्तू काढत) हे काय आहे?
उधोजीसाहेब : (हातातला कॅमेरा संतापाने थरथरतो-) दाढीचं सामान आहे, ओळखता येत नाही? आणि ही गरम पाण्याची बाटली!!
तपास अधिकारी : (सहज चौकशी केल्यागत) दाढीला लागतंच म्हणा!!
उधोजीसाहेब : (चवताळून) खामोश! नाव काय तुमचं!!
तपास अधिकारी : (ओळखपत्र दाखवत) तुम्हीच वाचा साहेब!!
उधोजीसाहेब : (डरकाळी मारत) मोदी-शहांच्या बॅगा तपासल्या का?
तपास अधिकारी : (अभिमानाने) अर्थात! पण त्यांच्या बॅगेत दाढीचं सामान नव्हतं!
उधोजीसाहेब : (डोळे गरागरा फिरवत) मग त्या मिंधे आणि फडणवीसांच्याही बॅगा तपासा!
तपास अधिकारी : (कर्तव्यनिष्ठुरतेचा कळस..) त्यांच्या तर तीन-तीनदा तपासतो! मागल्या लोकसभेच्या टायमाला त्यांच्या बॅगा मीच इतक्या वेळा तपासल्या की तेच मला फोन करुन विचारायला लागले की, ‘‘काहो, माझा टूथब्रश किती नंबरच्या बॅगेत ठेवलाय!’’
उधोजीसाहेब : (बुचकळ्यात पडत) मग?
तपास अधिकारी : फडणवीस साहेबांच्या तीन नंबरच्या बॅगेत टूथब्रश असतो, आणि ते शिंदेसाहेब तर मंजनच वापरतात!!
उधोजीसाहेब : (दातओठ खात) पंधरावीस दिवसात मी मुख्यमंत्री होतोच आहे, तेव्हा तुमची बदली गडचिरोलीच्या आऊटपोष्टीत करतो की नाही बघा!!
तपास अधिकारी : (गंभीर होत) आम्हाला आमच्या लायनीपरमानं जाऊ द्या साहेब!
उधोजीसाहेब : (वैतागून) ए, पॉवर आहे का तुम्हाला? कसली आलीये लाइन?
तपास अधिकारी : (डोळे मिचकावत) पुल देशपांड्यांच्या म्हैस कथेतला डायलॉग मारला, साहेब!!
उधोजीसाहेब : (थयथयाट करत) खामोश! खामोश! खामोश! ही विनोद करण्याची वेळ नाही!
तपास अधिकारी : (पुन्हा बॅगेत डोकं घालत) …दोन कुर्ते, दोन पायजमे, एक टावेल…त्या दुसऱ्या बॅगेत काय आहे, बघू?
उधोजीसाहेब : (संतापाने बेभान होत) दगड आणि धोंडे!!
तपास अधिकारी : (सुस्कारा सोडत) मग हरकत नाही! साहेब, आपण जाऊ शकता! सहकार्याबद्दल धन्यवाद!
उधोजीसाहेब : (धुमसत) आपणही जाऊ शकता! उद्या तुम्ही प्रसिद्ध होणार आहात! निघा!!