तीन दलालांच्या मदतीने आईने पोटच्या गोळ्याचा सौदा केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रेखा सोनावणे असे या निर्दयी मातेचे नाव आहे. हे चौघे दीड महिन्याच्या बाळाची विक्री करणार असल्याची माहिती मिळताच ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने बाळाच्या निर्दयी आईसह तीन दलालांना बेड्या ठोकल्या आहेत. वैशाली सोनावणे, दीपाली दुसिंग व किशोर सोनावणे अशी अटक केलेल्या तीन दलालांची नावे आहेत. या चौघांनी मुलीचा सौदा करून चार लाखांची मागणी केली होती.
रेखा सोनावणे भीक मागून उदरनिर्वाह करते. तिला दोन मुली व एक मुलगा आहे. त्यात आणखी चौथी मुलगी झाल्यानंतर त्यांचे संगोपन करायचे कसे, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. दरम्यान वैशाली, दीपाली व किशोर यांच्या मदतीने तिने बाळाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. याबाबत माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने बनावट ग्राहक बनून दलाल वैशाली हिच्यासोबत संपर्क केला. त्यावेळी वैशाली हिने 4 लाख रुपयांची मागणी केली. पोलिसांनी पहिले मुलीला बघू मग पैसे असा बनाव करत त्यांना कल्याणच्या सहजानंद चौक येथील रामदेव हॉटेलजवळ बोलावले. त्यानंतर सापळा रचून रंगेहाथ अटक केली.
चारही मुले बालगृहात
गुन्हे शाखेच्या पथकाने या चौघांविरोधात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात बाळ न्याय अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच रेखा यांची दीड महिन्याची मुलगी व ५ वर्षांच्या मुलाला डोंबिवलीतील जननी आशिष बालगृह येथे ठेवण्यात आले आहे. तर 7 आणि 9 वर्षांच्या दोन मुलींना अंबरनाथ येथील नीला बालसदन येथे पाठवण्यात आले आहे.
फिल्मी स्टाईलने केला पर्दाफास
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या चेतना चौधरी यांना मुलीच्या विक्रीची माहिती मिळताच त्यांनी गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, प्रतिबंध विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमले. या पथकाने फिल्मी स्टाईलने बनावट ग्राहक बनून दलाल वैशाली सोनावणे हिच्यासोबत संपर्क साधला. तिने बनावट ग्राहकाकडे चार लाखांची मागणी करताच पोलिसांनी बाळाला बघण्यासाठी घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर या पथकाने बाळाची विक्री करताना चौघांनाही रंगेहाथ अटक केली.