हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी विखुरलेल्या हिंदूंना व १८ पगड जातींना एकत्र आणले. हिंदवी स्वराज्य स्थापन केले, यातूनच मी प्रेरणा घेत अखंड हिंदुस्थानात पदयात्रा काढत हिंदूंचे एकत्रीकरण करण्यासाठी फिरत आहे. त्यामुळे हिंदूनी आता जातपात विसरुन एकत्र होणे गरजेचे असल्याचे वक्तव्य बागेश्वर धामचे श्री धीरेंद्र शास्त्री यांनी केले.
होम मैदानात बुधवारी मराठी साहित्य परिषद आयोजित संत संमेलनात ते बोलत होते. प्रारंभी मसाप द. सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांच्यासह प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, बागेश्वर सेवा समितीचे संजय साळुंखे, पंचांगकर्ते मोहन दाते, अविनाश महागावकर आणि मान्यवरांच्याहस्ते शास्त्री यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
श्री शास्त्री म्हणाले की, लोकांचे चित्र आणि चरित्र स्वच्छ असेल तोच हिंदू. माझे आयुष्य हिंदुत्व आणि सनातनासाठी समर्पित आहे मी कोणत्याही राजकारण्यासाठी काम करत नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी रहा. यशस्वी माणसांकडून आदर्श घेऊन तुम्ही मोठे व्हा.
विचारांची क्रांती उभी करण्यासाठी तलवारीच्या टोकावर दबावाने नाही तर हिंदुत्ववादी विचारांनीच भगवा फडकवता येणार आहे. हिंदूंच्या सणामुळे प्रदुषण होत असेल तर अन्य धर्मियांच्या सणांवरही बंदी आली पाहिजे.
तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये गोमातेची चरबी मिसळण्याचे काम करणारे, तरुणींची जनावरांप्रमाणे कत्तल करणाऱ्यांनाही धडा शिकवावा लागेल. काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे, प. बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांना जागा दाखवा.
माझ्या हिंदू एकत्रिकरणासाठी मी करत असलेल्या पदयात्रेत सहभागी व्हा. एका विरोधकाने माझी पदयात्रा अडवू असा इशारा दिला आहे, कशी अडवतो हेच मला पहायचे आहे. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, फक्त हिंदूंना जागवण्याचे काम करत आहोत. आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी हे करत आहे, असे ते यावेळी म्हणाले.
चिठ्ठीविना भविष्य व सन्मान
बागेश्वर धाममध्ये भविष्य ऐकण्याची उत्सुकता असणारे जातात. परंतु शास्त्री यांनी ‘मै बागेश्वर बाबा हूं, मुझे हिंदुराष्ट्र चाहिये’ असा फलक लिहिलेल्या युवकाला व्यासपीठावर बोलवले. एका तैलचित्रकारास गर्दीतून बोलावत चित्र कधी काढले, किती वाजता संपवले याचे भूत व भविष्य कथन केले.
भवानी पेठेतील गतिमंद मुलासह आलेल्या महिलेला बोलावत त्या मुलासाठी एकत्रित प्रार्थना केली. तसेच त्यांचे भविष्य काय असेल याची त्यांना थोडक्यात माहिती देत सन्मानही केला.
सप्तचिरंजीवांची नावे आणि सोलापूर...
अश्वत्थामा, बळीराजा, व्यासऋषी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम या सप्तचिरंजीवांची नावे घेत शास्त्रींनी बोलण्यास सुरवात केली. तसेच रामरक्षेतील ओळी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी आदींचा जयघोष केला.
केवळ हैदराबादेत नाही तर सोलापूरातही इतके वेडे लोक आहेत, हे मला माहित नव्हतं. महाराष्ट्र ही संतभूमी असल्याने राज्याच्याआधी ‘महा’ असे लिहीले आहे. तर सोलापूरबद्दल ‘खतरनाक’ व ‘महान’ असा शब्दप्रयोग त्यांनी केला. हिंदूंचा प्रचंड प्रतिसाद पाहून समाधान वाटल्याचेही ते म्हणाले.
लाकडाची मोळी आणि घोषणा...
सीमा आणि हसीना यांना आश्रय देणारे आपणच आहोत. प्रत्येक धर्मियांची राष्ट्रे आहेत, पण आपल्यावर अन्याय व्हायला लागले तर आपण कुठे जायचे. त्यासाठी आपण एक होणे गरजेचे आहे, हे त्यांनी लाकडाच्या मोळीच्या कथेने समजावून सांगितले.
द्राक्षाची किंमत घडात असताना असते. मण्या गळून पडल्यावर कमी होते. तसेच काही जणांना सेक्युलरचा किडा चावतो. ‘हम सब हिंदू एक है’, ‘जातपात की करो, बिदाई हम सब हिंदू भाई भाई’, ‘छेडेंगे तो, छोडेंगे नही’ ‘अब हमे भागना नही, जागना है’ अशा घोषणा देत त्यांनी अन्यधर्मीय प्रार्थनेसाठी एकत्र जमतात, आपणही त्यातून बोध घेत एकत्र जमावे, असे सांगितले.