‘प्रा. विजय नवले करिअरतज्ज्ञ
सध्यासंगणक, आयटी, सॉफ्टवेअर या करिअरचा बोलबाला आहे. करिअरमध्ये चांगल्या संधींसाठी हे क्षेत्र उत्तम आहे, असा अनुभव अनेकांचा आहे. इंजिनिअरिंग, सायन्ससोबतच पदवीचे काही स्पेशल अभ्यासक्रम या करिअरच्या पायाभरणीसाठी तयार केलेले आहेत.
त्यापैकी एक आहे बीसीए. बीसीए म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स. बीसीए शिक्षणात सॉफ्टवेअरमधील बेसिक ॲप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या संदर्भातील प्राथमिक स्वरूपाचा अभ्यासक्रम असतो.
कालावधी व पात्रता
बीसीए हा तीन वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे. यासाठी बारावीचे शिक्षण पूर्ण असावे. पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी कोणतीही प्रवेशपरीक्षा नाही. काही स्वायत्त विद्यापीठे किंवा काही अन्य विद्यापीठे प्रवेशपरीक्षा घेतात.
सायन्स, कॉमर्स, कला अशा कोणत्याही शाखेतील बारावी झालेला विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतो. बारावीमध्ये किमान ५० टक्के गुण असावेत. ही अट ५ टक्क्याने राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी शिथिल असते, तर काही विद्यापीठांमध्ये ४५% ही टोटल मार्कांची अट असते.
बारावीत संगणक हा विषय असायलाच हवे, असे काही अपेक्षित नसते. त्याचप्रमाणे काही विद्यापीठांमध्ये गणित हा विषय नसेल, तरीसुद्धा बीसीएला प्रवेश मिळू शकतो. इंग्रजी विषय मात्र अपेक्षित आहे. पारंपरिक विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये, स्वतंत्र विद्यापीठे, खासगी महाविद्यालये अशा ठिकाणी हा कोर्स करता येतो.
सध्याच्या बदलत्या काळात ऑनलाइन पद्धतीनेदेखील बीसीए करता येऊ शकते. अभियांत्रिकीच्या चारवर्षीय अभ्यासक्रमाशी बीसीएची थेट तुलना करता येणार नाही. अभियांत्रिकीला प्रवेश मिळतोय, चांगले मार्क्स आहेत, गुणवत्तादेखील आहे अशा विद्यार्थ्यांनी तसा अभियांत्रिकीचा प्रवेश टाळून केवळ सोपा कोर्स वाटतोय आणि तीन वर्षे हा कमी कालावधी आहे म्हणून बीसीए करू नये.
विषय
बिजनेस कम्युनिकेशन, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, प्रोग्रामिंग प्रिन्सिपल्स अँड अल्गोरिदम, कॉम्प्युटर फंडामेंटल अँड ऑफिस ऑटोमेशन, बिजनेस अकाउंटिंग, एलिमेंट्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, डेटाबेस मॅनेजमेंट, नेटवर्किंग, व्हिज्युअल बेसिक, सायबर लॉ, सिस्प्रो, ऑब्जेक्ट ओरिएन्टेड प्रोग्रामिंग, ह्यूमन रिसोर्स, मार्केटिंग, सी प्लस प्लस, डॉट नेट, कोर जावा, इंटरनेट प्रोग्रामिंग, ई-कॉमर्स मल्टिमीडिया सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम, ॲडव्हान्स जावा आदी विषय अभ्यासक्रमात असतात.
संधी
कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळाल्यास सर्वोत्तम. अर्थात बीई कॉम्प्युटरप्रमाणे नोकरीच्या व्यापक आणि जास्त पगाराच्या नोकऱ्या सुरुवातीला लगेच मिळणार नाहीत. त्यासाठी एमसीएच्या वाढीव तीन/दोनवर्षीय अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा लागेल, परंतु बीसीए उत्तमपणे केले असल्यास मात्र नोकरी मिळण्यात अडचण येणार नाही.
उत्तम मार्क्स, संगणकाचे आणि संगणक प्रणालींचे उत्तम ज्ञान, चांगले संभाषण कौशल्य असल्यास ते नोकरी मिळवताना उपयुक्त ठरू शकेल. सुरुवातीला पगार जरा कमी असेल, परंतु कामातील अनुभवातून पगार हळूहळू वाढतो. दर्जेदार कार्यकुशलता आणि चांगल्या अनुभवानंतर करिअरचे मोठे दालन खुले होईल.
उच्च शिक्षण
एमसीए किंवा एमसीएस अशी संगणकीय पदव्युत्तर मास्टर डिग्री अत्यंत गरजेची आहे. सी, सी प्लस प्लस, व्हीबी, जावा, डॉट नेट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, पायथन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा सायन्स अशाप्रकारचे काही संगणक संदर्भातील कोर्सेस करता येतील. बीसीए हा इंजिनीअरिंग, मेडिकलसारखा मोठा करिअर ऑप्शन नसला तरीही प्रामाणिक मेहनतीच्या आधारे अशा शिक्षणानंतर संगणक क्षेत्रातील मुख्य प्रवाहात येता येते. अनेकांनी तसे करून दाखविले आहे.
स्कोप
काहींना थेट प्रोग्रामर नाही, पण संगणकीय प्रणालींशी जवळीक असणाऱ्या काही जबाबदाऱ्यांवर त्यांची वर्णी लागू शकते. ज्यांना शिक्षण केवळ कोणती तरी पदवी म्हणून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी करिअरचे अन्य मार्ग उपलब्ध असतात.
संगणकाची आवड असणाऱ्यांनी या शिक्षणाचा विचार करायला हरकत नाही. जर आर्ट्स आणि कॉमर्समधील पदवीसंदर्भातील कोअर शिक्षण घेणार नसाल, तर बी.कॉम., बी.ए. अशा पारंपरिक पदवीपेक्षा हा मार्ग संगणक या मुद्द्यावर उजवा ठरू शकतो. सर्व क्षेत्रांना स्कोप असतो आणि स्कोप हा आपण तयार करायचा असतो, या उक्तीप्रमाणे निर्णय घ्यावा.