- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
परीक्षेच्या ताणामुळे, वाढत्या स्पर्धेमुळे मुले आणि तरुण अधिकाधिक तणावग्रस्त होत असून, ते टोकाचे निर्णय घेताना दिसत आहेत. हे वातावरण धक्कादायक आणि भीतीदायक आहे. आजच्या धावपळीच्या काळात हा ताण दिवसेंदिवस वाढू शकतो.
त्यामुळे मुले चिंताग्रस्त होतात. पालक या नात्याने तुमच्या मुलांना या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही मदत करणं अपेक्षित आहे. तुम्ही तुमच्या मुलांशी अपयश, वाढता तणाव, परीक्षा अशा संवेदनशील विषयांवर आवर्जून बोला. त्यांच्या मनातील भीती काढा. मुलांशी संवाद साधण्यासाठी खालील मुद्दे तुम्हाला नक्कीच मदत करतील.
क्रमांक नाही, गुणवत्ता पाहा
तुमच्या पाल्याचे यश केवळ त्याला कितवा क्रमांक मिळाला, या एकाच प्रश्नावर जोखू नका. क्रमांक, श्रेणी यावरून यश किंवा गुणवत्ता ठरवू नका. ‘तुला कोणता क्रमांक किंवा श्रेणी मिळाली?’ असा प्रश्न विचारण्याऐवजी त्याला कोणता विषय किती कळला? त्याच्यात बौद्धिक वाढ किती झाली? असे प्रश्न विचारा. तुम्ही खालील संवादांची मदत घेऊ शकता -
‘अभ्यास करताना तुम्ही नवीन किंवा मनोरंजक असे काय शिकलात?, ‘या प्रकल्पातील तुमची प्रगती कशी आहे?’, ‘तुम्ही या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे असं वाटतं. यातील कोणती गोष्ट तुम्हाला फार आवडते किंवा अभिमानास्पद वाटते?’, ‘तुम्ही तुमच्या अभ्यासाचं वेळापत्रक ठरवून त्यानुसार दिनचर्येचं स्वतंत्रपणे नियोजन केलं याचं मला खरोखर कौतुक वाटतं. हे सगळं कसं जमवलं?’ अशा प्रकारचे संवाद कोणतंही नातं अधिक बळकट करतात. त्यामुळे वाढीच्या मानसिकतेला प्रोत्साहन मिळते. मुलांना आव्हाने पेलण्याची शक्ती मिळते. सुधारणेच्या संधी दिसू लागतात.
अपयश पचवा
अपयशी होण्याची भीती प्रत्येकाला असते. मात्र, तरीही तो शिकण्याचा नैसर्गिक भाग आहे, हे समजून घ्यायला हवं. आपल्या स्वत:च्या आयुष्यातील अपयश, अडथळे हे आपल्या वाढीस अनेकदा कारणीभूत ठरतात. अशा वेळी तुम्ही हे म्हणू शकता की, “मला आठवतं, जेव्हा मी माझ्या कामात चूक केली, तेव्हा मला सुरुवातीला लाज वाटली. मात्र, नंतर मला समजलं की, पुढच्या वेळी तेच काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यात मला मदत झाली होती.”
“तुला माहीत आहे का की, अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनाही त्यांच्या आयुष्यात अपयशांना सामोरं जावं लागलं आहे. मात्र, ते तिथे थांबले नाहीत. ते त्यातून शिकले आणि प्रयत्न करत राहिले.”
“आम्ही कधीच परिपूर्णतेचा आग्रह धरला नाही. चुकांना सुधारण्याचं ध्येय ठेवलं. चुका करणं म्हणजे तुम्ही काही तरी शिकत आहात आणि शिकता शिकता समृद्ध होत आहात.”
मुक्त संवाद
घरात असे वातावरण तयार करा की, जिथे तुमच्या मुलाला त्याच्या चिंता, काळजी व्यक्त करायला भीती वाटणार नाही. तो त्याच्या अडचणी मुक्तपणे बोलू शकेल. मुलांच्या मनातली भीती नाकारू नका. त्यांच्या भावना समजून घ्या. तुम्ही त्यांना खालील प्रकारे बोलतं करू शकता -
‘‘तुझ्या आगामी स्पर्धेबद्दल तुला काय वाटतं? तयारी कशी सुरू आहे?’’
‘‘निराशा थोडा काळ येणं ठीक आहे. मात्र, तुला ज्या गोष्टीचा त्रास होतो आहे, ती तू माझ्याशी शेअर करू शकतोस.”
“मला माहीत आहे की, तू तुझ्या परीक्षेमुळे काळजीत, तणावात आहेस. मात्र, मी सदैव तुझ्यासोबत आहे.”
वास्तववादी ध्येय ठरवा
अवास्तव अपेक्षांमुळे मुलांवर जबरदस्त दबाव येतो. त्यामुळे तुमच्या मुलाला वास्तवाची जाणीव करून द्या आणि मग ध्येय ठरवा. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी छोटे छोटे टप्पे ठरवा. याबाबत तुम्ही मुलांना हे म्हणू शकता की, “अचूकतेचं किंवा अवास्तव ध्येय ठेवण्याऐवजी सुधारणा करण्याचं आणि वास्तववादी ध्येय ठेवूया.”“लक्षात ठेवा, कोणीही परिपूर्ण नाही. लहान लहान सुधारणांमधूनच माणूस परिपूर्ण होत जातो.”
तणावाचे व्यवस्थापन
तुमच्या मुलांना तणावाचं व्यवस्थापन करण्यास शिकवा. त्यासाठी विविध व्यावहारिक मार्गांची ओळख करून द्या. जसे की, दीर्घ श्वास घेणे, योगासने, इत्यादी. तुम्ही खालील प्रकारे संवाद साधू शकता -
“जेव्हा तुम्हाला चिंता वाटत असेल, तेव्हा पाच वेळा दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात, त्यांचा विचार करा.”
“तुम्ही खूप थकले असाल तर, संगीत ऐकण्यासाठी छोटा ५ मिनिटांचा ब्रेक घ्या, काही वेळ खेळा, काही तरी प्रेरणादायी वाचा, आठवणी लिहा, चित्रे काढा.’’ “जेव्हा तुम्हाला चिंता वाटू लागते, तेव्हा शांत, आनंदी ठिकाणी सहलीला जा.”
मुलांशी विविध विषयांवर आणि मुद्द्यांवर संवाद कसा साधावा, याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी pranjal_gundesha या इन्स्टाग्राम पेजला भेट द्या.