Mumbai Crime: मुंबईच्या गोराई परिसरात गोणीत सापडलेल्या मृतदेहानं संपूर्ण शहरात खळबळ माजवली होती. मृतदेहाचे 7 तुकडे करुन ते प्लॅस्टिकच्या लहान डब्यांमध्ये टाकून ते गोणीत भरण्यात आले होते. आता याप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. पोलिसांनी मृत प्रेयसीच्या भावाला अटक केली आहे. आरोपीनं आधी हत्या करुन त्यानंतर मृतदेहाचे सात तुकडे केले होते. पण, हातावर गोंदवलेल्या इंग्रजी अक्षरांमुळे या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
गोराई येथे ज्या व्यक्तीला मृतदेह सापडला होता. त्या व्यक्तीचे आंतरधर्मीय अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. कालांतरानं मुलीनं त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडले होते. त्यानंतरही तो तिला भेटण्यासाठी बिहारहून मुंबईत आला. त्यानंतर मात्र मोठा वाद झाला. प्रकरण मुलीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर त्या तरुणाची मुलीच्या भावानं हत्या केली, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोराईजवळ ज्या व्यक्तीच्या मृतदेह गोणीत सापडला, तो मुळचा बिहार दहभंगा येथील कानहोळी गावातील रहिवाशी होता. मुलीच्या भावानं रघुनंदनला भाईंदर येथे भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर तो त्याला घेऊन एका घरात गेला. तिथे दोघांनी दारू प्यायली. रघुनंदन ज्यावेळी दारूच्या नशेत पूर्णपणे दंग झाल्या, त्यानंतर मुलीच्या भावानं त्याचा जीव घेतला. नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि रंगाच्या डब्ब्यांमध्ये भरले. ते सर्व डब्बे एका गोणीत भरले आणि गोराई येथे नेत एका निर्जनस्थळी फेकून दिले. रघुनंदनच्या हातावरच्या टॅटूवरुन सर्व प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी रघुनंदनच्या हातावरच्या टॅटूवरुन मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहाच्या हातावर 'आरए' अशी इंग्रजी अक्षरं कोरलेली होती. रघुनंदनचं ज्या मुलीवर प्रेम होतं, त्या मुलीचं नाव 'ए' वरुन सुरू होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणात त्या मुलीचा आणि रिक्षाचालकाचा काहीही संबंध नसल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, मुलीला पाच भाऊ असून हत्येत केवळ एकाच भावाचा सहभाग आहे.
दरम्यान, आंतरधर्मीय प्रेमसंबंधामुळे मुलीच्या नातेवाईकांनी रघुनंदनची हत्या केल्याचा संशय त्याचे वडील जितेंद्र नाव पासवान यांनी व्यक्त केला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जितेंद्र यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर हातावर गोंदवलेल अक्षरांच्या आधारे रघुनंदनच्या वडिलांनी मुलाचा मृतदेह ओळखला.
मृत रघुनंदन बिहार दहभंगा येथील कानहोळी गावातील रहिवाशी होता. वर्षभरापूर्वी रघुनंदन एका रुग्णालयात काम करत होता. त्यावेळी त्यानं एका 17 वर्षांच्या मुलीला औषधं देऊन मदत केली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर हळूहळू त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मुलीच्या घरच्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी रघुनंदनला जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे जाऊन गावातील काही वरिष्ठांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवलं. त्यानंतर मुलीला तिच्या भावांनी मुंबईला आणलं. तरीसुद्धा रघुनंदन मुलीला सारखा फोन करायचा. त्यामुळे कुटुंबीय संतप्त झाले होते. त्याच रागातून मुलीच्या भावानं रघुनंदनचा जीव घेतला.