'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
शिवानी पांढरे November 14, 2024 02:43 PM

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघात काही दिवसांपुर्वी कल्याणीनगर अपघाताच्या आरोप प्रत्यारोप यांच्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. आता त्या घटनेवरून पुन्हा एकदा मोठा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातात दोघांना चिरडणाऱ्यांना मदत करण्यासाठी हे पोलीस ठाण्यात जाऊन बसले होते, असा आमदार सुनील टिंगरेवर हल्लाबोल करण्यात आला आहे. त्याचबरोबर अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड ही या प्रकरणातील आरोपी असलेली सुनील टिंगरे यांच्या जवळची माणसे असल्याचं ॲड.असीम सरोदे यांनी म्हटलं आहे, निर्भय बनो सभेत सरोदेंनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

श्रीमंताच्या मुलाने पोर्शे गाडीखाली दोघांना चिरडले आणि मुलाला मदत करण्यासाठी तुम्ही निवडून दिलेले आमदार पोलीस ठाण्यात जाऊन बसले होते. श्रीमंताच्या मुलाची बाजू घेणाऱ्या त्या आमदाराला प्रश्न विचारायचे नाहीत का? पुरावे बदलण्याचा, पोलिसांवर दबाव आणण्याचा आरोप या आमदारावर आहे. तुमच्या आमच्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा हे आमदार धावून येतात का? मग त्या दिवशी हे रात्री पोलीस स्टेशनला का बसले होते? श्रीमंत माणसे आमदाराला पोसत असतील आणि हे आमदार श्रीमंताचे गुलाम झाले असतील तर ते आपले लोकसेवक नाहीत. या प्रकरणात पोलिसांनी अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली. हे दोघे आमदारासोबत गाडीत फिरत असतात. हे दोघेही आमदाराच्या जवळची माणसे आहेत असाही आरोप होतो, असं असीम सरोदे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणालेत असीम सरोदे?

एका श्रीमंत मुलाने दोघांना कारखाली चिरडून टाकलं. कल्याणीनगरमध्ये झालेले वर्षे कार दुर्घटना सर्वांना माहीत आहे. म्हणजे श्रीमंतांची मुलं काहीही करतील आणि त्यांना मदत करायला तुम्ही निवडून दिलेला मागच्या वेळेचा एक माणूस पोलीस स्टेशनला जर जाऊन बसत असेल तर आपण प्रश्न विचारायचा नाही का त्या आमदाराला? कशासाठी त्या श्रीमंत मुलाची बाजू घ्यायला गेला होता. पुरावे बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या आमदारांवर आहे. पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप या आमदारावर आहे. तुमच्या आमच्यावर अत्याचार होतात तेव्हा रात्री उठून हे आमदार येतात का घरी? त्यावेळी तुमच्या घरी येतो तुम्हाला मदत करतात का ते? त्यादिवशी पोलीस स्टेशनला का जाऊन बसले, श्रीमंत माणसं जर आमदारांना पोसत असतील आणि आमदार श्रीमंत माणसांकडे नोकर झाले असतील तर ते आपले लोकसेवक नाही तर त्यांना निवडून द्यायचं नाही, असं सरोदे म्हणालेत. 

दोन माणसं त्यांच्यासोबत नेहमी गाडीत फिरतात असं पुढे आलेला आहे. त्यांची नावं आहेत अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड हे दोघेजण कोण आहेत, यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने देखील नाकारलेला आहे. असं सांगण्यात येत आहे, अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड हे आमदार सुनील टिंगरे यांच्या जवळचे आहेत, असं सरोदे पुढे बोलताना म्हणालेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.