Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Saam TV November 13, 2024 01:45 PM

Maharashtra weather update News in Marathi : राज्यात हिवाळ्याला सुरुवात होणार असे संकेत मिळाले असतानाच पावसाचे सावट आले आहे. आज राज्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताच राज्यात पावसाचा जोर कमी होईल, असेही हवामान विभागाने वर्तवले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Forecast News in Marathi)

मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीची चाहूल लागली होती. रात्री हवेत गारवा वाढल्यामुळे लवकरच राज्यात गुलाबी थंडी येईल, असा अंदाज वर्तवला होता. पण पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं हवामान विभागाने सांगितले. राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे कुठे कोसळणार पाऊस ?

हवामान विभागाने १५ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. वादळी वारा आणि विजांसह १५ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यता आली आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उन्हाचा चटका कमी होणार -

राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावऱण राहण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Mumbai Weather Update मुंबईत ढगाळ वातावरण -

मंगळवारी मुंबईचे किमान तापमान २० अंश नोंदवण्यात आलेय. मुंबई महानगर प्रदेशात पुढील काही दिवस हवामान किंचित ढगाळ नोंदविण्यात येईल. बुधवारीही मुंबापुरीच्या किमान तापमानाचा पारा २० अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मात्र गुरुवार ते रविवारीदरम्यान मुंबईच्या तापमानात वाढ होईल.तर २० नोव्हेंबरनंतर किमान तापमान आणखी खाली येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर अखेर मुंबईमध्ये थंडी पडण्याची शक्यता आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.