महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीचा जोरात प्रचार सुरु आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्गात तीन सभा झाल्या. आज भाजपा नेते आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. “तुझा मालक जेव्हा लंडनला जातो, तेव्हा सोबत कुठला उद्योगपती तिकीट काढण्यासाठी असतो? हॉटेल बुकिंग करताना गुजराती माणसावर, गुजराती समाजावर आक्षेप नसतो. ते खर्च उचलतात ते चालतं, एकापण रेस्टॉरंटमध्ये बिल भरत नाही ते चालतं” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. “तुझ्या घाणेरड्या राजकारणासाठी सकाळी उठून आमची सकाळ खराब करण्याच काम असेल, तर त्याचं चोख उत्तर 23 तारखेला मिळेल” असं नितेश राणे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या तीन सभा झाल्या. या सभाच जिल्ह्यातील राजकारणावर काय परिणाम होईल, या प्रश्नावर नितेश राणे यांनी उत्तर दिलं. “काल उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या. 23 तारखेला आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार. त्यात उद्धव ठाकरेंचा सिंहाचा नाही, खारीचा वाटा असेल” असं नितेश राणे म्हणाले. “जेव्हा-जेव्हा उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात प्रचारासाठी आले, आधी लोकसभेला आले, जिथे सभा झाली, तिथून मला शिव्या-शाप दिल्या. माझं मतदान 29 वरुन 42 हजारवर गेलं. आमच्यासाठी त्यांचा पायगुणच इतका चांगला आहे की, ते आले आमच्या तिन्ही सीट कन्फर्म झाल्या. आता फक्त गुलाल उडवायचा बाकी आहे. उद्धव ठाकरे उबाठाच्या उमेदवारांसाठी पनवती आहे, पण आमच्यासाठी ते चांगले आहेत” असं नितेश राणे म्हणाले.
‘कोण जो कोळी-नोळी आणलेला’
“काल जी भाषा वापरली गेली, कोण जो कोळी-नोळी आणलेला, त्यामुळे जनमानसात रोष आहे. आमच्या हक्कासाठी लढणारे, 24 तास उपलब्ध असणारे राणे कुटुंबिय, केसरकर आहेत. आमच्या भूमिपुत्रांना बाहेरुन येऊन शिव्य़ा दिल्या, त्याचं उत्तर 23 तारखेला मिळेल” असं नितेश राणे म्हणाले.