भूसंपादनाच्या खिंडीत अडकला गणेशखिंड रस्ता
esakal September 21, 2024 01:45 AM

पुणे, ता. २० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते रिझर्व्ह बॅंक कृषी महाविद्यालयापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम वेगाने झाले, मात्र चाफेकर पुतळा ते संचेती रूग्णालय या दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाचे काम अद्यापि संथ गतीने सुरू आहे. आत्तापर्यंत केवळ ११ जागा ताब्यात आल्या असून, उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरूच आहेत.
गणेशखिंड रस्त्यावर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच दुमजली उड्डाण पूल व हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाल्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीची समस्या आणखीनच गंभीर झाली होती. वाहतूक कोंडीच्या समस्येबरोबरच मेट्रो स्थानकासाठीच्या पायऱ्या आणि उड्डाण पुलाचा रॅम्प या दोन्ही कारणांसाठी जास्त जागेची आवश्यकता होती. विकास आराखड्यामध्ये गणेशखिंड रस्ता ४५ मीटरचा आहे, प्रत्यक्षात ३५ मीटरच रस्ता उपलब्ध आहे.

पहिला टप्पा
विकास आराखड्यानुसार गणेशखिंड रस्ता ४५ मीटर करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम महापालिका, पीएमआरडीएने हाती घेतले होते. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषी महाराज चौक ते रिझर्व्ह बॅंक कृषी महाविद्यालयापर्यंत, तर आकाशवाणी कॉलनी ते विद्यापीठ चौकापर्यंतचे रस्ता रुंदीकरणाचे काम अडथळे पार करत गतीने पूर्ण करण्यात आले.

दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यात खैरेवाडी येथील चापेकर पुतळा चौक ते संचेती रूग्णालय आणि संचेती रूग्णालय ते आकाशवाणी कॉलनी, अशा प्रकारे गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा समावेश होतो. संचेती रुग्णालयाजवळील सुभाषचंद्र बोस चौक ते चापेकर पुतळा या गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रुंदीकरणासाठी ५२ जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी आत्तापर्यंत केवळ ११ जागा ताब्यात आल्या आहेत. उर्वरित ४१ जागा अद्याप ताब्यात आलेल्या नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या जागांमध्ये आकाशवाणी, पोलिस, एलआयसी यांसारख्या शासकीय, निमशासकीय संस्थांसह खासगी नागरिकांच्या मिळकती आहेत. या जागा मिळण्यात अडचणी येत आहेत. महापालिका प्रशासनाकडून तांत्रिक अडचणी दूर करून जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भूसंपादन कायद्याच्या वापराने काही जागा ताब्यात
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी एप्रिल महिन्यात गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी महत्त्वाची भूमिका घेतली होती. रुंदीकरणाच्या जागांचा ताबा मिळण्यासाठी डॉ. भोसले यांनी भूसंपादन कायद्याचा वापर करण्यावर भर दिला होता. त्यामुळे काही जागा महापालिकेच्या ताब्यात येण्यास मदत झाली होती.

गणेशखिंड रस्ता भूसंपादनाची सद्यःस्थिती
१४ हजार चौरस मीटर
रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा

१४१ कोटी रुपये
भूसंपादनासाठी अपेक्षित खर्च

५२
भूसंपादनासाठी आवश्यक मिळकती

११
महापालिकेने भूसंपादन केलेल्या मिळकती

३८
खासगी मिळकतींची संख्या - ३८
१०
ताबा मिळालेल्या खासगी मिळकती

१४
सरकारी मिळकतींची संख्या


ताबा मिळालेली सरकारी मिळकत

गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाचा पहिला टप्पा संपला, दुसऱ्या टप्प्यात चापेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटलदरम्यानच्या मिळकतींपैकी ११ जागांचा ताबा मिळाला आहे. उर्वरित जागांमध्ये सरकारी व खासगी जागांचा समावेश आहे. मोजणी नकाशा आल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.
-महेश पाटील, उपायुक्त, मालमत्ता विभाग, पुणे महापालिका

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.