काम पूर्णत्वाआधीच बिलाची उचल
esakal September 21, 2024 01:45 AM

1651
कसबा सांगाव ः येथील अंगणवाडी क्र. १८५ च्या नूतन इमारतीत उघड्यावर ठेवलेली शौचालयाची टाकी. (छायाचित्र : संतोष माळी)
.............
काम पूर्णत्वाआधीच बिलाची उचल

कसबा सांगावमधील अजब प्रकार ः अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण, दर्जाहीन

सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. २० ः येथील अंगणवाडी क्रमांक १८५ चे बांधकाम वाडदे वसाहतीमधील विद्या मंदिर शाळेजवळ केले आहे. केवळ आठ महिन्यांत बांधकाम पूर्ण करून बिलाची उचल केली आहे. मात्र निकृष्ट आणि अपूर्ण बांधकाम करूनही संपूर्ण बिलाची रक्कम खर्ची पडल्याचा अजब कारभार पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून केला आहे. यामुळे ग्रामस्थ, पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून २०२०-२१ च्या जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे साडे आठ लाख रुपयांची निविदा काढली आहे. २७ जानेवारी २०२२ रोजी बांधकामास सुरुवात होऊन २९ सप्टेंबर २०२२ रोजी इमारत अंगणवाडीकडे हस्तांतरित केली. मात्र शौचालयाची टाकी केवळ दगडाच्या टेकूच्या सहाय्याने ठेवली असून, ती बांधकाम करून बंदिस्त केलेली नाही. मुख्य दरवाजाची चौकट, शौचालय, स्टोअर रूमच्या एका भिंतीला तडे गेले आहेत. पावसाळ्यात स्लॅबमधून एक दोन ठिकाणी पाणी ठिबकते, तर दक्षिणेकडील भिंतीवर पाण्याचा ओलावा पसरतो. परिणामी भिंतीवर लावलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा आणि अभ्यासक्रमातील बोलकी छायाचित्रे बाजूला काढून ठेवल्याचे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सांगितले.
शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यासाठी नळ कनेक्शन काढले आहे. मात्र, त्याला चावी जोडलेली नाही. पाण्याची टाकीसुद्धा बाजूच्या प्राथमिक शाळेत ठेवली आहे. त्यामुळे शौचालय वापराविना बंदच आहे. असे असूनही बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवून ठेकेदाराने निधी उचलला आहे. निकृष्ट बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित कामाचे बिल व एमबी कोणत्या पद्धतीने तयार केले, निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच ॲड. वीरश्री जाधव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पंचायत समितीच्या बांधकाम विभाग उपअभियंत्यांना दिले आहे.
...
कोट...
अंगणवाडी इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपूर्वीचे आहे. मी महिन्याभरापूर्वी कार्यभार स्वीकारला आहे. ठेकेदार आणि तत्कालीन अभियंता यांना नोटीस काढली आहे. अभियंता सेवानिवृत्त झाला असला तरी त्याची पेन्शन थांबविली जाईल. अपूर्ण कामे पूर्ण करून घेऊ.
आर. बी. पाटील,
उपअभियंता पंचायत समिती कागल
.....
माहिती फलक किचन कट्ट्याखाली
कोणत्याही शासकीय कामाच्या पूर्ततेनंतर संपूर्ण कामाची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावले जातात. मात्र, या कामाची माहिती देणारा फलक किचन कट्ट्याखाली इतर साहित्याच्या अडगळीत झाकून ठेवल्याचे दिसून आले. कामाच्या पूर्णत्वाची तारीखही त्याच्यावर दिसत नाही. यावरूनच ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा स्पष्ट होत असल्याची चर्चा सुरू आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.