सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतीगृहात महिला आयोगाच्या अध्यक्ष जातात तेंव्हा….!!
Inshorts Marathi September 21, 2024 07:45 AM

जळगाव दि. २० ( जिमाका) – शालेय जीवन हे रोपटे आहे, त्याला अभ्यासरुपी संस्कार देऊन त्याचे वृक्षात रूपांतर करण्याचे काम दुसरे कोणी नाही तर स्वतः करायचे असते याची जाणीव होण्यासाठी आयुष्याचं ध्येय निश्चित करायचे असते. ते ध्येय मग तुम्हाला कोणतेही प्रलोभन आले तरी विचलित करत नाही. हे सगळं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सांगत होत्या, मध्येच त्या आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत होत्या. त्यात त्याही तल्लीन झाल्या होत्या आणि ऐकणाऱ्या मुलीही समरस झाल्या होत्या.

सामाजिक न्याय न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात त्यांचा कोणताही पूर्व नियोजित दौरा नसताना आल्या. जळगाव जिल्ह्यात त्यांचा 18 आणि 19 सप्टेंबर या दोन दिवसाचा दौरा होता. तो नियोजित दौरा पूर्ण करून त्या 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मुलींच्या वसतीगृहात आल्या.

मुलींशी मनसोक्त गप्पा

यावेळी त्यांनी मुलींशी मनसोक्त गप्पा मारल्या, सुरुवातीला अवघडलेल्या मुली नंतर त्यांच्या संवादात एकरूप झाल्या. यावेळी मुलींनी मनात असलेल्या अनेक प्रश्नांना वाट मोकळी करून दिली. यावेळी श्रीमती चाकणकर यांनी आईच्या ममतेनी मुलींना वाढते सायबर गुन्हे, त्यात होणारी मुलींची फसवणूक याबाबत सविस्तर माहिती दिली. या सायबरच्या मायाजाळात न अडकता आपल्याला जीवनात कसे यशस्वी होता येईल, जेणे करून आपल्या माता – पित्याची मान अभिमानाने उंचावेल हे पहा.

त्यांनी महिलांच्या सुरक्षितते विषयीचे कायदे, महिला आयोगाचे कामकाज, महिलांच्या सबलीकरणासाठीच्या शासनाच्या योजना याची सविस्तर माहिती दिली. या वेळी त्यांनी वसतीगृहातील स्वयंपाक घरात जाऊन जे मुलींना रोज जेवण दिले जाते. त्या जेवणाचा आस्वादही घेतला. वसतीगृहातील सोयीसुविधांची पाहणी केली.

याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. महिला आणि मुलीसाठी सामाजिक न्याय विभाग जिल्ह्यात काय काय करत आहे हे पण विशद केले. याप्रसंगी महिला व बालकल्याण अधिकारी विनिता सोनगत, अधिक्षक वैशाली पाटील उपस्थिती होत्या.

०००

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.