आर्थिक नियोजनातील शिस्त आयुष्यातील प्रत्येक वाटेवर लाभदायक ठरते. कर्ज घेताना या शिस्तीचा अधिक फायदा आपल्याला होतो. विशेषत गृहकर्जाच्या बाबतीत हप्ता चुकू नये व गृहकर्जाचे ओझे कधीच जाणवू नये यासाठी काही गोष्टींचे पालन आपण करायलाच हवे.
कर्ज या संकल्पनेकडे आपला समाज वेगळ्या दृष्टीने पाहतो. परंतु सध्याच्या बदललेल्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत गृहकर्ज ही तशी काही अंशी अनिवार्य गोष्ट असल्याने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. लग्नाप्रमाणेच गृहकर्ज ही तुमच्या कर्ज पुरविणाऱ्या वित्तसंस्थेशी दीर्घकालीन वचनबद्धताच असते. आपल्या जीवनात काहीही अकल्पित घटना घडू शकतात याबाबत आपण नक्कीच अनभिज्ञ नसतो. म्हणूनच कर्ज किंवा गृहकर्ज याचा विचार करता त्यात सुसूत्रता यावी याकरिता काही सोप्या गोष्टी अथवा नियम अवलंबिले पाहिजेत. याबाबतची शिस्त आणि नियोजन तुम्हाला तुमचे इएमआय वेळेवर भरण्यात मदत करेल. यासाठी पुढील तीन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
सक्रियपणे योजना आखा आणि तुमच्या खर्चाचा विशेषतः दिवाळीसारख्या सणांसाठी मागोवा घ्या.
यंत्रणेवर विश्वास ठेवा आणि सक्रिय असलेल्या खात्यातून स्वयंचलित पद्धतीने इएमआय भरण्याची पद्धत निवडा.
तीन महिन्यांचा आपत्कालीन निधी ठेवा, जो तुमचे सर्व खर्च भागवू शकेल.
याबाबत पुढीलप्रमाणे केलेले नियोजन तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
गृहकर्ज घेण्यासाठी पाऊल टाकण्यापूर्वी प्रथम योग्य पूर्वतयारी करा. सर्वात आधी आपल्या वित्तीय क्षमतेचा आढावा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे इएमआय तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावेत. तुमचे गृहकर्जाचे हप्ते सुरू असताना अचानक उद्भवणारा वैद्यकीय खर्च किंवा कोणत्याही प्रकारच्या अनपेक्षित खर्चासाठी तरतूद करून ठेवणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी ऑनलाइन पाहणी करून आपण आर्थिक क्षमता किती सक्षम आहात, हे समजून घ्या. यासाठी इएमआय आणि इतर खर्च यांची योग्य सांगड घालता येते का हे पहा.
यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यातील उत्पन्नाचा आगाऊ अंदाज बांधत कधीही कर्ज घेऊ नका. कारण एक वेळ अशीही येऊ शकते की, जेव्हा तुम्हाला घेतलेले कर्ज एक आर्थिक बोजा वाटू लागेल. हे होऊ नये यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आपण करीत असलेल्या डिजिटल पेमेंटसह इतर सर्व खर्चाचा सतत मागोवा घेणे ही सवय आर्थिक नियोजनात महत्त्वपूर्ण ठरते. आपल्याला छोटे, दैनंदिन व्यवहार अनेकदा लक्षात येत नाहीत. त्यामुळे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातच पैशांची चणचण जाणवते.
बहुतेक वित्तसंस्था, बँका स्वयंचलित पद्धतीने ईएमआयचा भरणा व्हावा अशी सुविधा प्राप्त करून देतात. या सुविधांद्वारे तुम्हाला तुमचे बँक खाते देय तारखेला स्वयंचलित कपातीसाठी जोडण्यात येते. त्यामुळे गृहकर्जाचा हप्ता वेळेत भरला जातो आणि कोणताही विलंब होण्याची शक्यता कमी होते. ही पद्धत हप्ता भरण्याची तारीख चुकण्याबाबतची जोखीम कमी करते. यासाठी एक गोष्ट मात्र प्रकर्षाने पाळली पहिजे ते म्हणजे तुम्हाला त्या खात्यात रोख रक्कम नियमित ठेवायची आहे.
अनेकदा कितीही आर्थिक नियोजन केले तरी काही अडचणी उद्भवतात. म्हणूनच जर एखादा अनपेक्षित खर्च उद्भवल्यामुळे तुम्ही इएमआय भरणा करू शकत नसाल, तर इएमआय चुकण्याआधी तुमच्या कर्जपुरवठादार बँक, वित्तसंस्थेशी योग्य संवाद साधा. कर्ज देणारे सामान्यत सक्रिय कर्जदारांना परतफेडीसाठी तारीख वाढवून किंवा काही दिवसांचा अतिरिक्त कालावधी देऊन मदतीला तयार असतात.
आर्थिक नियोजन किंवा गृहकर्जाच्या हप्त्यांबाबतच्या नियोजनात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आप्तकालीन निधी असणे आवश्यक नव्हे अनिवार्य ठरते. गृहकर्जाचे हप्ते देताना आपल्या खात्यात तीन महिन्यांचा आपत्कालीन निधी असणे हे एक आर्थिक सुरक्षा कवच आहे. ज्यायोगे आर्थिकदृष्ट्या दोलायमान अवस्था उद्भवल्यास त्या अनिश्चिततेच्या काळात चिंता, ताण यापासून आपण दूर राहू शकतो. अन्यथा कर्जाचा हप्ता कसा फेडायचा या विवंचनेत आपण स्थिरता हरवून बसतो. अशा प्रकारे केलेले नियोजन व ही सहज उपलब्ध होणारी बचत आपले अत्यावश्यक खर्च भागवू शकते.
या नियोजनामुळे नोकरी गमावणे, वैद्यकीय आणीबाणी किंवा अशा इतर अनपेक्षित प्रसंगांना तोंड देता येऊ शकते. यामुळे तीन महिन्यांच्या आपल्या दैनंदिन खर्चासाठी रक्कम बाजूला ठेवून तुम्ही कर्ज थकण्याच्या सापळ्यात जाण्यापासून वाचत तुमचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकता. स्वतच्या आर्थिक कल्याणाचे रक्षण करणे, तणाव कमी करणे आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे, हा केवळ सुज्ञपणा नव्हे तर आर्थिक खबरदारी घेण्यासारखे आहे.
लक्षात ठेवा, आजची शिस्त म्हणजे कर्जमुक्त भविष्यकाळ. यामुळे तुम्ही आयुष्यातील पेचप्रसंग आणि वेळोवेळी येणाऱया वळणांतून आत्मविश्वासाने वाटचाल करत राहाल व तुमचे स्वप्नातील घर हा तुमच्यासाठी एक आशियाना राहील, ओझे नव्हे. आर्थिक नियोजनातील ही कायमस्वरूपी शाश्वती तयार होईल. तुमच्या ट्रकवर सतत वाटचाल करत राहा आणि आनंदी घरमालक बना.