तुमच्या पाठिंब्याशिवाय सरकार अशक्य आहे
Marathi September 21, 2024 12:24 PM

हरियाणातील प्रचारावेळी केजरीवाल यांचा दावा

वृत्तसंस्था / चंदीगढ

हरियाणात आम आदमी पक्षाच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करणे कोणालाही शक्य होणार नाही, असे प्रतिपादन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. हरियाणात आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी गेलेल्या केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केले.

हरियाणात 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. आता तेथे राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती होण्यासाठी चर्चा केली जात होती. तथापि, काही जागांसंबंधी वाद निर्माण झाल्याने युती होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी युती केली असून या पक्षाला एक जागा सोडण्यात आली आहे. काँग्रेस 90 पैकी 89 जागांवर निवडणूक लढवित आहे. भारतीय जनता पक्षाने सर्व 90 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या दोन्ही मुख्य पक्षांशिवाय जननायक जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय लोकदल इत्यादी पक्षही मैदानात असल्याने ही निवडणूक बहुरंगी होणार आहे.

भाजप 10 वर्षे सत्तेत

हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष गेली 10 वर्षे सत्तेत आहे. या पक्षाचे नेते मनोहरलाल खट्टर हे साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री होते. नंतर, लोकसभा निवडणुकीच्या आधी नायाबसिंग सैनी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली. गेली पाच वर्षे राज्यात भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष यांच्या युतीचे सरकार होते. तथापि, काही महिन्यांपूर्वी ही युती तुटली आहे.

आप 80 जागा लढविणार

आम आदमी पक्षाने या राज्यातील 90 पैकी 80 जागा लढविण्याची योजना आखली असून उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली आहे. आपल्या पक्षाचे या राज्यात 10 वर्षांहून अधिक काळ कार्य आहे. त्यामुळे जनता यावेळी आपल्या पक्षालाच निर्णायक कौल देईल असा आम्हाला विश्वास आहे. तथापि, काही कारणामुळे आम्हाला स्पष्ट जनादेश मिळाला नाही, तरी आमच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पक्ष सत्तेवर येऊ शकणार नाही, असे केजरीवाल यांनी प्रतिपादन केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.