'सांगत्ये ऐका' ते 'तूजी औकात काये?'पर्यंत
esakal September 21, 2024 11:45 AM

हंसा वाडकर यांनी मध्यमवर्गीय सुरक्षिततेची चौकट मोडून टाकली. ‘गावनवरी’त वेदिका कुमारस्वामी ही देवदासी थेट वाचकांशी बोलते. या बोलण्यात राग आहे, बंडखोरी आहे, शारीरिक मोह आहे, अगतिकता तर आहेच...

देश-काल-स्थिती कोणतीही असो आणि भारताच्या संदर्भात तर जात कोणतीही असो, स्त्रीला अन्याय-अत्याचारांचा सामना करतच जगावं लागतं. मग ती हंसा वाडकर यांच्यासारखी पैशात लोळणारी नामवंत मराठी नटी असो की वेदिका कुमारस्वामीसारखी एकेकाळची देवदासी असो. अलीकडेच या दोघींचं जीवन केंद्रस्थानी ठेवून सादर केलेले दोन प्रयोग मुंबईत बघितले.

हंसा वाडकर (१९२४-१९७१) यांनी एक काळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली होती. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर होतं. त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे ‘संत सखू’, ‘रामशास्त्री’, ‘पुढचं पाऊल’ वगैरे. त्यांचा सर्वांत गाजलेला चित्रपट म्हणजे १९५९ मध्ये आलेला ‘सांगत्ये ऐका’. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत माने होते; तर पटकथा व्यंकटेश माडगूळकरांची होती.

हा चित्रपट तेव्हा सुमारे १३१ आठवडे चालला! हंसाबाईंनी सुमारे चाळीस मराठी-हिंदी चित्रपटांत भूमिका सादर केल्या. मात्र, एवढी लोकप्रियता, एवढे आर्थिक यश मिळूनही त्यांचं जीवन एखाद्या शोकांतिकेसारखं होतं. आजकाल नट-नट्यांची आत्मचरित्रं, त्यांच्या पतींनी किंवा पत्नींनी लिहिलेली कथनं सतत प्रसिद्ध होत असतात. अलीकडेच अशोक सराफ यांचं ‘मी बहुरूपी’ प्रसिद्ध झालं. या प्रकाराची सुरुवात हंसा वाडकरांच्या ‘सांगत्ये ऐका’ या छोटेखानी आत्मचरित्रापासून झाली, असं म्हणता येतं.

हंसा वाडकरांचे ‘सांगत्ये ऐका’ १९७० मध्ये पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलं होतं. त्याचं शब्दांकन अरुण साधूंनी केलं होतं. तेव्हा ‘सांगत्ये ऐका’ने धमाल उडवून दिली होती. एक तर एक नटी स्वतःच्या जीवनातील वादळांबद्दल, चढउतारांबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल मनमोकळेपणे सांगत होती. दुसरं म्हणजे, हंसा वाडकरांना जबरदस्त ग्लॅमर होतं. या आत्मकथनावर नंतर श्याम बेनेगल यांनी १९७७ मध्ये ‘भूमिका’ हा हिंदी चित्रपट बनवला. यात हंसाबाईची भूमिका स्मिता पाटीलने सादर केली होती. आता त्याच आत्मकथनावर सुमारे दीड तास चालणारा ‘सांगत्ये ऐका’ एकपात्री प्रयोग सादर होत असतो.

ज्येष्ठ दिग्दर्शक विश्वास सोहोनी, अभिनेत्री मानसी कुलकर्णी आणि नंदलाल रेळे (पार्श्वसंगीत) यांनी मिळून सादर केलेला प्रयोग देखणा होतो. आत्मकथन असल्यामुळे निवेदन प्रथम पुरुषी एकवचनी असणं अपरिहार्य होतं. ‘सांगत्ये ऐका’ या आत्मकथनाची रंगावृत्ती सोहोनी यांची आहे. या आत्मकथनाबद्दल अनेकांना साधारण माहिती असते. हंसाबाईंना अनेक पुरुषांनी फसवलं. काहींनी त्यांचं लैंगिक शोषण केलं; तर काहींनी आर्थिक... काहींनी तर दोन्ही. त्यातले अनेक पुरुष समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती होत्या.

‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर खासगी गप्पांत सांगायचे, की जेव्हा हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणार असल्याची बातमी पसरली, तेव्हा पुण्यातल्या अनेक थोरामोठ्यांच्या पोटात गोळा आला होता. बाई आत्मकथनात आपलं नाव घेते की काय, या भीतीने अनेकांची झोप उडाली होती. ‘सांगत्ये ऐका’ त्यातल्या दुर्मिळ प्रामाणिकपणामुळे फार गाजलं. १९७० मध्ये पुस्तकरूपाने आलेल्या या आत्मकथनावर १९७७ मध्ये हिंदीत चित्रपट आला होता आणि आता २०२४ साली एकपात्री प्रयोग.

हे एकल सादरीकरण मानसी कुलकर्णीने पेश केलं आहे. असं एकल सादरीकरण, तेसुद्धा हंसा वाडकर यांच्यासारख्या स्त्रीच्या आयुष्यावर आधारित, सादर करणं सोपं नाही. हंसा वाडकर यांनी मध्यमवर्गीय सुरक्षिततेची चौकट मोडून टाकली होती. त्यांनी टिपिकल मध्यमवर्गीय मूल्यं त्यागली होती. अशा वादळी आयुष्यातले चढउतार, बालपण ते प्रौढ आयुष्य, हा प्रवास सादर करणं हे आव्हान मानसी कुलकर्णीने व्यवस्थित पेललं आहे.

मला सुरुवातीला त्यांचं ब्राह्मणी दिसणं, हावभाव, देहबोली खटकत होती. चरित्रावर आधारलेले सादरीकरण करताना चरित्रनायिकेचं दिसणं हा महत्त्वाचा घटक असतोच. शिवाजी महाराज कसे दिसत असतील, संत तुकाराम कसे दिसत असतील, याची जनमानसात प्रतिमा निर्माण झालेली असते. (विष्णुपंत पागनीसांचा ‘संत तुकाराम’ किंवा चंद्रकांत मांंडरे यांनी साकार केलेले ‘शिवाजी महाराज’ आठवा).

हंसा वाडकर तर आजच्या काळातील नटी. त्यांचे चित्रपट उपलब्ध आहेत. अशा स्थितीत मानसी कुलकर्णीची ‘हंसा वाडकर’ सुरुवातीला स्वीकारताना जड जाते हे मान्य केले तरी नंतर मात्र तिचा अभिनय पकड घेतो. त्यामुळे ‘सांगत्ये ऐका’ हे जसं वाचत राहावंस वाटतं तसंच विश्वास सोहोनींनी दिग्दर्शित केलेला ‘सांगत्ये ऐका’चा प्रयोग बघत राहावासा वाटतो.

२०१८ मध्ये वेदिका कुमारस्वामीचं ‘गावनवरी’ पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालं आणि मराठीत चांगलीच खळबळ माजली. तोपर्यंत मराठी साहित्यात, रंगमंचावर देवदासी आल्या होत्या; पण त्या उच्चवर्णीय लेखकांच्या नजरेतून. जयवंत दळवींची ‘महानंदा’ कादंबरी तसंच शं. ना. नवरेंचं ‘गुंतता हृदय हे’ या नाटकातून देवदासी रसिकांसमोर आल्या होत्या. ‘गावनवरी’त वेदिका कुमारस्वामी ही देवदासी थेट वाचकांशी बोलते.

या बोलण्यात राग आहे, बंडखोरी आहे, शारीरिक मोह आहे, अगतिकता तर आहेच. ‘गावनवरी’तील कविता फक्त स्त्रीवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दलच नव्हत्या; तर तिच्या लैंगिक गरजांबद्दलही होत्या. आता ‘गावनवरी’वर आधारित ‘तूजी औकात काये?’ अशी दीड तासांची संगीतिका सादर होत आहे. ‘तूजी औकात काये?’ हा प्रश्न जरी हेगडेशेठ वेदिकाला विचारत असला तरी तो शेकडो वर्षांपासून अनेक संस्कृतींत पुरुषांनी स्त्रीला विचारलेला आहे.

अनेक ठिकाणी आजही ‘स्त्री म्हणजे भोगवस्तू’ असं मनात पक्कं ठसलेलं असतं. येथे वेदिकाची एक कविता आहे, ‘हेगडे, उभाय माझ्या बोचक्यात / हेगडेला कळत नाही माज्यातू उठून कुठं जावं / मला कुठं जावं हा प्रश्नच नही / येकदा देवाच्या गळ्यात बांधलं की सर्वे प्रश्न / मिटतेत घट्ट / मग रस्ता उरत नही बेचकी उरते / हेगडे मी तुला सांगणार नाही, माजी औकात काय्ये’...

जगभरचा इतिहास दाखवतो, की जवळजवळ सर्व मानवी समाजांत स्त्रीला पुरुषाच्या मालकीची वस्तू समजलं गेलेलं होतं. काही ठिकाणी तर अजूनही अशी स्थिती आहे. या समजुतीला पहिल्यांदा छेद दिला कार्ल मार्क्सने. स्त्रीच्या शोषणामागचे धर्मावर आधारलेलं षड्यंत्र मार्क्स-एंगल्सने शोधून काढलं. स्त्रीच्या शोषणाला धार्मिक समर्थन दिलं. म्हणून तर तिला ‘देवदासी’ म्हटलं गेलं. प्रत्यक्ष देवाची सेवा करणारी ती देवदासी.

असं धार्मिक समर्थन मिळालं की मग उलट प्रश्न विचारण्याची सोय उरत नाही. नंतर मात्र हळूहळू स्त्रीच्या सक्षमीकरणाच्या दिशेने प्रगती होत गेली. महात्मा फुले पती-पत्नींमुळे शिक्षणाचा अधिकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे समानतेचा अधिकार, मतदानाचा आणि वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार वगैरे मिळत गेले. असं असलं तरी आजही फार पल्ला गाठायचा आहे, हे लक्षात येतं.

वेदिकाच्या कवितांतला बंडखोरीचा सूर तसा नवा नाही. एका कवितेत ती नवऱ्याला खडसावते, ‘तुझी सत्ता आहे देहावर समज / माझेवरी तुझे किंचित नाही’... मात्र ही मांडणी अधिक प्रभावी होते ती सादरीकरणात. याचे श्रेय नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन प्रतीक्षा खासनीस अन् निकिता ठुबे यांच्याप्रमाणेच त्यांना समर्थ साथ देणारे कल्पेश समेळ, स्वप्नील भावे व दीप डबरे या कलावंत/वादक मंडळींना जाते.

या सादरीकरणात गाणं-बजावण्याचा समर्पक वापर केल्यामुळे प्रयोग कमालीचा रंगतो. शिवाय प्रतीक्षा आणि निकिताचा झोकून देऊन केलेला अभिनय. अशा कलाकृती प्रेक्षकांसमोर, वाचकांसमोर आरसा धरतात. आज २०२४ मध्येसुद्धा या परिस्थितीत कितीसा फरक पडला आहे, असा प्रश्न विचारला तर?

(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलासंस्कृतीच्या घडामोडींचे अभ्यासक आणि राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.