मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट, IMD चा पुढील 3 दिवसांचा अंदाज काय?
मुक्ता सरदेशमुख September 21, 2024 02:43 PM

Marathwada Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर अंदमान समुद्रात व आजूबाजूच्या परिसरात पुढील 24 तासांसाठी सक्रिय राहणार असून राज्यात विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आज शनिवारी मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

आज बहुतांश राज्यात पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावणार असून विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. 

कोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट? 

आज विदर्भातील 7 जिल्ह्यांना व मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरधाराशिव जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. पुढील तीन दिवसात बहुतांश मराठवाड्यात पावसाची हजेरी राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.


राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार 

राज्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर व उपनगरांसाठी हलका ते मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवलाय.

सोमवार -मंगळवार पावसाचे 

राज्यात 23 व 24 सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची हजेरी राहणार असून कोकण वगळता बहुतांश  राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय

परतीचा प्रवास सुरु होण्याआधी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. येत्या 24 तासांत मराठवाडा, खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात आता परतीचा पाऊस राजस्थान व आजूबाजूच्या परिसरात सुरु झाल्याचं हवमान विभागानं सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.