AFG vs SA: अफगाणिस्तानने इतिहास रचला! दक्षिण आफ्रिकेच्या ६१ धावांत पडल्या १० विकेट्स, १७७ धावांनी हरले
esakal September 21, 2024 05:45 PM
Afghanistan won their first ever series win against South Africa

अफगाणिस्ता क्रिकेट संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७७ धावांनी पराभव करून इतिहास रचला. वन डे क्रिकेटमधील अफगाणिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ठरला. राशिद खानने त्याच्या वाढदिवसाला झालेल्या सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करताना संघाला तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतत २-० असा विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विदेशीय मालिका जिंकली.

हशमतुल्ला शाहिदीच्या अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेला ३१२ धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना टेम्बा बवुमाचा संघ ५० षटकंही टिकू शकला नाही आणि ३४.२ षटकांत १३४ धावांवर सर्व फलंदाज तंबूत परतले. राशिदने १९ धावांत पाच विकेट घेतल्या. वाढदिवसाला वन डे क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणारा तो जगातला पहिला गोलंदाज ठरला. यापूर्वी २००७ मध्ये आफ्रिकेच्या वेर्नोन फिलँडरने आयर्लंडविरुद्ध १२ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या आणि ती सर्वोत्तक कामगिरी होती. स्टुअर्ट ब्रॉडने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४४ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.

रहमनुल्ला गुर्बाजच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तान संघाने ४ बाद ३११ धावा केल्या. गुर्बाजनंतर आजमतुल्ला उमरजाईने ८६ धावांची तुफानी खेळी केली. रहमत शाहने ५० धावांची वादळी खेळी केली. अफगाणिस्तान संघाने दिलेल्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने राशिद खान आणि नांगेयालिया खारोटे यांच्यासमोर शरणागती पत्करली.

६१ धावांत १० विकेट्स..

रशिद आणि खारोटे या दोघांनी आफ्रिकेच्या डावाला सुरूंग लावला. राशिदने ९-१-१९-५ अशी अप्रतिम स्पेल टाकली. खारोटेने ६.२ षटकांत २६ धावा देत चार बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून बावुमाने सर्वाधिक ३८ धावा केल्या. बवुमा व टॉनी डी जॉर्जी ( ३१) यांनी ७३ धावांची सलामी दिली. पण, ओमारजाईने ही भागीदारी तोडली. बिनबाद ७३ वरून आफ्रिकेचा संघ पुढील ६१ धावांत घरी परतला. आफ्रिकेने पुढील ६१ धावांत १० विकेट्स गमावल्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.