तुळशीचं रोप लावण्याआधी या 5 गोष्टींकडे लक्ष द्या, डेरेदार तुळशीसह मंजिरींनी भरून जाईल तुळस
मुक्ता सरदेशमुख September 22, 2024 03:43 PM

How to Grow Tulsi Plant: भारतात शतकानुशतकं औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाणाऱ्या तुळशीच्या रोपाचं फार महत्व आहे. घरासमोर किंवा घरात तुळशीचं रोप लावणं हे अतिशय पवित्र समजलं जातं. प्राचीन धर्मग्रंथांमधील उल्लेखांवरून या तुळशीच्या रोपाचा साधारण तीन हजार वर्षांहून अधिक समृद्ध इतिहास आहे. दिवाळीपूर्वी आता अनेकजण तुळशीची रोपं विकत आणतात. पण अनेकदा रोप लावूनही ते नीट टिकत नाही. यासाठी काही सोप्या आणि घरगुती टिप्सने तुळशीचं रोप घरातही लावता येऊ शकतं. काही गोष्टींकडे रोप लावताना लक्ष दिलं तर तुळशीचं रोप डेरेदार होतं आणि भरपूर मंजिरींनी लगडूनही जातं. 

तुळशीचं रोप साधी मंजिरी मातीत टाकली तरी उगवतं असं म्हटलं जात असलं तरी या रोपाची सुरुवातीचे काही दिवस चांगली काळजी घ्यावी लागते. त्यासाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा..

कुंडीची निवड करताना काळजी घ्या

एकदा तुळस लावली की तीच तुळस वर्षानुवर्ष टिकते. पण कोणती कुंडी आपण निवडली आहे? कोणती माती वापरली आहे?यावरही झाडाचं आयुष्य ठरतं. प्लास्टिक किंवा सिमेंटची कुंडी तुळस लावण्यासाठी वापरत असाल तर तुळशीचं रोप त्यात फार दिवस टिकत नाही. तुळशीसाठी कायम मातीच्या कुंडीची किवा मातीच्या वृंदावनाची निवड करावी. शक्यतो मोठ्या कुंड्या यासाठी निवडाव्या जेणेकरून हवा खेळती राहून मातीचं आरोग्य सुधारेल.

माती कोणती वापरावी?

तुळशीला कोणतीही माती चालते पण सगळ्या पोषक तत्त्वांमुळे तुळशीचं आरोग्य चांगलं राहतं. आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे तुळशीची रोपं आपोआप वाढलेली दिसतील तिथली  मातीसुद्धा तुम्हाला घेता येऊ शकेल. तुळशीच्या रोपाला लावताना ३० टक्के रेती आणि ७० टक्के माती असायला हवी. जर मातीत अधिक पाणी झालं तर तुळस नासते. बुरशी येण्याचा धोकाही असतो., त्यामुळे रेती अधिकचे पाणी शोषून घेते. आपल्या कुंडीत अर्ध्याहून थोडी अधिक माती घालून सामान लेव्हल करून घ्या. माती जास्त किंवा कमी व्हायला नको. ती नेहमी कुंडीच्या आकाराच्या अर्ध्याहून १-१.५ इंच जास्त असावी.

तुळशीच्या रोपाला खत काय द्यावं?

घरगुती पद्धतीनं तुळस लावत असाल तर कडुलिंबाची पानं शक्य असेल तर शेणखत देणं चांगलं ठरतं. यासाठी कडुलिंबाची पानं सुकवून त्याची पावडर मातीत घातल्यास तुळस डेरेदार होते. रोपाची लागवड केल्यावर चमचाभर मीठ पाण्यात घालून झाडाच्या मुळाशी हे पाणी घाला. यानं मुळांची वाढ होण्यास मदत मिळते. 

स्वच्छ सुर्यप्रकाशात तुळशीचं रोप ठेवा पण..

तुळशीच्या रोपाला साधारण ४ ते ५ तास स्वच्छ सुर्यप्रकाशात ठेवण्याची गरज असते. त्यामुळे तुळशीचं रोप कडक उन्हात ठेवण्यापेक्षा जिथे ४-५ तास सलग हलका सूर्यप्रकाश येतो अशा जागी ठेवा. दर दोन तीन महिन्यांनी कुंडीची जागा बदला. रोप जसंजसं वाढेल तरी त्याची छाटणी करा.

तुळशीला पाणी घालताना..

 पाणी घालताना तुळशीला एक दिवसाआड पाणी घालणे योग्य असते आणि पाणी घालताना पानांवर कधीच टाकू नये. याने तुळशीच्या खोडाला इजा होते. त्यामुळे पाणी मातीत घालावे आणि हळू हळू घालावे. जेणेकरून नाजूक मुळांना त्रास होणार नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.