Amravati Health Department : आणखी एका मातेचा मृत्यू, तीन रुग्णालयांनी रेफर करून, चौथ्या रुग्णालयात मृत्यू
esakal September 22, 2024 04:45 PM

चिखलदरा : मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारमार्फत कोट्यावधीच्या योजना राबविल्या जातात. मात्र तरीही मेळघाटातील बालमृत्यू व मातामृत्यूचे सत्र थांबत नसल्याची गंभीर स्थिती आहे. त्यात आणखी एका मातेच्या मृत्यूने भर पडली आहे. तब्बल तीन रुग्णालयांनी या महिलेला रेफर केले व चौथ्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

चिखलदरा तालुक्यातील भडोरा या गावातील एका मातेचा मृत्यू झाला असून या मातामृत्यूने एकाच खळबळ उडाली आहे. भंडोरा गावातील शीला अरविंद भूसुम (वय २६) ही महिला साडेआठ महिन्याची गरोदर होती. १९ सप्टेंबर रोजी या महिलेची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेला चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले.

परंतु तिची प्रकृती खालावत असल्याने अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. या महिलेच्या शरीरात रक्त कमी असल्यामुळे तेथे रक्त देण्यात आले. परंतु त्यानंतर या महिलेला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) रेफर करण्यात आले. प्रस्तुतीला वेळ असल्याने डफरीन येथून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु तिची प्रकृती अजूनच खालावल्याने तिला आयसीयू मध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी (ता.२१) दुपारी बारा वाजता या महिलेचा मृत्यू झाला.

रुग्णालय की रेफर सेंटर

मेळघाटच्या शासकीय रुग्णालयांना अत्याधुनिक सोयी पुरविण्यात येत असल्याचे वेळोवेळी सांगण्यात येते. प्रत्यक्षात ही रुग्णालये रेफर सेंटर झाली आहेत की काय? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही आरोग्य विभागातील वरिष्ठांपासून लोकप्रतिनिधी सुद्धा संवेदनशील नसल्याचा आरोप होत आहे.

या महिलेच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या होत्या. ही महिला सिकलसेल पॉझिटिव्ह असल्यामुळे या अगोदरही त्या महिलेला रक्त दिले होते. तसेच हायरिक्स असल्यामुळे वेळोवेळी सर्व तपासण्या होत होत्या. त्यामुळेच आम्ही या महिलेला १९ तारखेला भरती करून घेतले होते. पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. उपचारदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

-डॉ. राकेश अलोकार,

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.