शतक अन् ६ विकेट्स! R Ashwin ने घरचं मैदान गाजवलं; कर्टनी वॉल्श यांचा विक्रम मोडला, तर शेन वॉर्नशी बरोबरी
esakal September 22, 2024 04:45 PM

R Ashwin Records: भारत विरुद्ध बांग्लादेश संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेला पहिला कसोटी सामना आर अश्विनसाठी विक्रमी ठरला आहे. अश्विनने पहिल्या डावात फलंदाजी करताना शतकी खेळी केली होती. त्यानंतर आता त्याने गोलंदाजीतही कमाल केली आहे. त्याने दुसऱ्या डावात ६ विकेट्स पूर्ण करण्याबरोबरच मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

अश्विनने कसोटीमध्ये एका डावात ५ विकेट्स घेण्याची ही ३७ वी वेळ आहे. त्यामुळे त्याने आता कसोटीत सर्वाधिकवेळा एका डावात ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सर रिचर्ड हॅडली यांना मागे टाकत दुसर्या क्रमांकावरील शेन वॉर्न याची बरोबरी केली आहे. वॉर्न यानेही ३७ वेळा कसोटीत डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन अव्वल क्रमांकावर आहे. मुरलीधरनने तब्बल ६७ वेळा डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच अश्विननने सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही आठवे स्थान मिळवले आहे. त्याने कर्टनी वॉल्श यांच्या ५१९ विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. अश्विनच्या आता कसोटीत १०१ सामन्यांमध्ये ५२२ विकेट्स झाल्या आहेत.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

८०० विकेट्स - मुथय्या मुरलीधरन (१३३ सामने)

७०८ विकेट्स - शेन वॉर्न (१४५ सामने)

७०४ विकेट्स - जेम्स अँडरसन (१८८ सामने)

६१९ विकेट्स - अनिल कुंबळे (१३२ सामने)

६०४ विकेट्स - स्टूअर्ट ब्रॉड (१६७ सामने)

५६३ विकेट्स - ग्लेन मॅकग्रा (१२४ सामने)

५३० विकेट्स - नॅथन लायन (१२९ सामने)

५२२ विकेट्स - आर अश्विन (१०१ सामने)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.