संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
महेश गलांडे September 22, 2024 09:13 PM

Sangram singh: नवी दिल्ली : भारतीय एमएमए फायटर संग्राम सिंहने पाकिस्तानी फायटरला धोबीपछाड देत नवा इतिहास रचला आहे. मिक्सड आर्शल आर्ट (MMA) म्हणजेच एमएमएच्या गामा आंतरराष्ट्रीय फायटींग चॅम्पियनशीपमधील 93 किलो वजनी गटात संग्राम सिंहने शानदार विजय मिळवला. जॉर्जिया येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये संग्रामने पाकिस्तानचा फायटर अली रजा नसीर याचा पराभव करत तिरंगा उंचावला. संग्रामने अवघ्या 1 मिनिट 30 सेकंदात रजा नसीरला धूळ चारली. विशेष म्हणजे एमएमए स्पर्धेतील हा पहिलाच सामना होता, ज्यामध्ये त्याने स्वत:च्या आणि भारताच्या नावे नवा विक्रम रचला आहे. या विजयानंतर संग्राम सिंहने (Sangram singh) ट्विटरवरुन सर्वांचे आभार मानले आहेत, तसेच भारत (India) सरकारकडून अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.  

एमएमए फायटींग स्पर्धेत जिंकणारा संग्राम सिंह हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय फायटींग स्पर्धेतील 93 किलो वजनी गटात भारतीय फायटरद्वारे सर्वात कमी वेळेत विजय मिळवण्याचा विक्रमही संग्राम सिंहच्या नावावर जमा झालाय. संग्राम सिंहने या सामन्याच्या माध्यमातून एमएमएमध्ये एंट्री केली अन् पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फायटरला धूळ चारली. संग्रामचा पहिलाचा सामना पाकिस्तानच्या फायटरविरुद्ध होता. त्यामुळे, देशभरातील फायटर प्रेमी व एमएमए चाहत्यांच्या नजरा संग्रामच्या सामन्याकडे लागल्या होत्या. मात्र, संग्रामनेही काही मिनिटांतच भारतीयांची स्वप्न पूर्ण करत पाकिस्तानी फायटर रजा नसीरला लोळवले. त्यामुळे, एमएमए स्पर्धेत नव्या विक्रमाचा अध्याय लिहिला. 

ट्विटरवरु मानले आभार, व्यक्त केली अपेक्षा

संग्राम सिंहच्या या विश्वविजयानंतर जगभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भारतीय चाहत्यांकडूनही त्यांचे कौतूक करण्यात येत आहे. चाहत्यांकडून होत असलेल्या अभिनंदनाच्या वर्षावावर संग्रामने आभारपूर्वक पोस्ट लिहिली आहे. संग्रामने ट्विटरवरुन सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच, मी भारतासाठी हा सामना जिंकू शकलो, याचा मला अभिमान वाटतो. आजचा विजय म्हणजे एमएमएम स्पर्धेतील भारताच्या उत्कृष्ट भविष्यासाठी पडलेलं पहिलं पाऊल आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्यास भारत सरकार देखील मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेसाठी योग्य ती पाऊल उचलेल. त्यामुळे, तरुण वर्गाला या खेळात येण्यासाठी, करिअरसाठी प्रोत्साहन मिळेल, असे संग्राम सिंहने ट्विटवरुन म्हटले आहे. तर, माझ्या या विजयात माझे कोच भुपेश कुमार यांचं अमूल्य योगदान आहे, मी त्यांचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत. तसेच, माझे आंतरराष्ट्रीय कोच डेविड सर यांनीही मला फुल्ल सपोर्ट केला. जर हे दोन कोच नसते, तर माझी तयारी चांगली झाली नसती, असे म्हणत आपल्या कोचप्रतीही संग्राम सिंहने आदर व्यक्त केला आहे.

... तर राजकारणातून निवृत्ती घेईन; अजित पवारांनी खडसावल्यानंतर उमेश पाटलांची घोषणा

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.