नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज
esakal September 26, 2024 12:45 AM

नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठ सज्ज

मंदीतून बाहेर पडण्याचे वेध ; धार्मिक पर्यटन बहरणार

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः पितृपंधरवडा म्हणजे मंदीचा काळ. अनेकजण या काळात खरेदीसह आर्थिक व्यवहार वर्ज्य मानतात; मात्र हाच बाजार जेव्हा नवरात्रोत्सवात सुरू होतो तसतसा दसरा आणि दिवाळीपर्यंत फुलत जातो. चिपळूण शहर आणि परिसरात सध्या हेच चित्र आहे. अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी कपडे, तेल, पूजासाहित्य, खाद्यपदार्थ, धार्मिक पर्यटन अशी सगळीच बाजारपेठेच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. समाधानकारक पावसामुळे यावर्षी बाजाराला मंदीतून बाहेर पडण्याचे वेध लागले आहे.
श्री गणेशोत्सव संपताच मंडळांची नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी फक्त शहरी भागात दिसणारे टिपऱ्यांचे वलय ग्रामीण भागातही आहे. गुरूवारी ३ ऑक्टोबरला घटस्थापना करण्यात येणार असून, नवरात्रोत्सवाची सुरवात होणार आहे. नवरात्रोत्सवातील भक्तीमय वातावरणात आई देवीची यथाशक्ती मनोभावे स्थापना, पूजा, मांडणी केली जाते. आठ दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठा पुजेच्या वस्तूंनी, लांब वात, तेल, दगडी दिवा, देवपळ्याची काडी, कुंकू, हळद, मूर्ती, प्रतिमा यांसह अनेक वस्तू विक्रीसाठी सजल्या आहेत. पितृपंधरवड्यात खरेदीसह आर्थिक उलाढाल मंदावल्यानंतर नवरात्रोत्सवापासून बाजारात तेजीला सुरवात होते. त्यासाठी आतापासून बाजारात रंगरंगोटी केलेल्या साध्या टिपरी, घुंगरू, बेरींग, अॅल्युमिनियम, रंगीबेरंगी दोरीच्या टिपऱ्या बाजारात आल्या आहेत. लहान मुली, महिलांचे घागरा, चुनरी, ओढण्या, साजशृंगार, अखंडित नऊ दिवस ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी तेल, माळा, फुले, रोषणाई, महिलांच्या उपवासाचे पदार्थ, रंगीबेरंगी साड्या, खाद्यपदार्थ, विजेची रोषणाई, कपडे अशा सगळ्यात बाजारात चैतन्य येणार आहे. येथील मंदिरांमध्ये भक्तांची नवरात्र काळात दर्शनासाठी मांदियाळी असते. त्यामुळे धार्मिक पर्यटन बहरलेले पाहायला मिळणार आहे.
----------
टिपरीचे प्रकार व दर :

* साधी रंगीत ः १० ते २० रुपये जोडी
* रंगीबेरंगी डिझाईनची टिपरी - २० ते ३० रुपये जोडी
* घुंगराची टिपरी- ४० रुपये
* बेरिंगची फिरणारी ः ५० रुपये जोडी

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.