धर्मवीर चित्रपटामुळे सामान्य माणसाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Inshorts Marathi September 27, 2024 08:45 AM

मुंबई, दि. २६: एका सामान्य माणसाचे नेतृत्व समाजाच्या कल्याणासाठी संघर्षातून उभे राहते. स्व. आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवनावर आधारित धर्मवीर-२ या चित्रपटातून अशाच प्रकारे एका सामान्य माणसाच्या नेतृत्वाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रीमियर कार्यक्रमप्रसंगी आयनॉक्स चित्रपट गृह येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस उपस्थित होते. चित्रपटाला शुभेच्छा देताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्व. आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवन प्रवासातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उभे राहिले आहे. एखाद्या चित्रपटातील चरित्र नायक काल्पनिक असू शकतात. पण आपण ज्यांना पाहिले, त्यांच्याबद्दल वाचले, एकले आहेत. असे चरित्र नायक ज्यावेळी पडद्यावर पाहायला मिळतात, त्यावेळी लोक त्यांच्याशी आपापल्या पद्धतीने जुळत जातात. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्कंठा लागली होती. धर्मवीर-१ या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्याच पद्धतीने धर्मवीर-२ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

०००००

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.