'आहारही काटेकोर हवा'
esakal September 28, 2024 08:45 AM

सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्याची गरज आहे. त्यासाठी मी दररोज न चुकता व्यायाम करते. स्वतःचे आरोग्य तंदुरुस्त राखण्यासाठी काळजी घेते आणि पोषक आहाराचे सेवन करते. कारण, आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहार खूप गरजेचा आहे.  जिममध्ये जाणे मी कधीच टाळत नाही.

कितीही काम असो किंवा कितीही धावपळ असो; पण मी थोडाफार का होईना व्यायाम नक्कीच करते. त्याचबरोबर योगा आणि स्ट्रेचिंग करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी वर्कआउट झाल्यानंतर या गोष्टी न विसरता करते. अनेकदा एक्सरसाईज म्हणून मी नृत्य करण्यालाही प्राधान्य देते. त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराची हालचाल होते अन् मन प्रसन्न होते.

ध्यानधारणेबद्दल मला फारशी ओढ नसली, तरी वर्कआउट करणे माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. माझा आहार खूप काळजीपूर्वक निवडते. कारण आपण काय खातो, यावरच आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती ठरत असते. विशेष म्हणजे मी ठरावीक वेळेनंतर खाण्याचे पथ्य पाळते. सायंकाळनंतर मी जड अन्न कधीही खात नाही.

कारण त्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यासाठी मी हलक्या अन्नपदार्थांना प्राधान्य देते. माझ्या आहारामध्ये पालेभाज्यांचा सर्वाधिक समावेश असतो. याचा फायदा आपल्या कुटुंबालाही होतो. कारण आपल्यामुळे सर्व कुटुंबाला पालेभाज्या खाव्या लागतात. आपल्या शरीरासाठी प्रोटिन किती पाहिजे, या गोष्टीवर लक्ष देणेही गरजेचे आहे.

त्यासाठी मी दररोज अंडी आणि प्रोटिन पावडर घेते. तेलकट आणि गोड पदार्थ मी आहारातून टाळते. कारण त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. विशेष म्हणजे घरी बनवलेले पदार्थ खाण्याला मी प्राधान्य देते.  चित्रीकरण असेल, तर  अनेकांना बाहेरचे पदार्थ खावे लागतात. तरीही मी घरी बनवलेले अन्नपदार्थ खाण्यास प्राधान्य देते.

या सर्व गोष्टी मी काटेकोरपणे पाळत असले, तरी कधीतरी पाणीपुरी आणि भेळ खायला मला आवडते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस मी हे पदार्थ आवर्जून खाते. त्यानंतर मात्र माझे वेळापत्रक ठरलेले असते. चॉकलेटमधील प्रोटिन बार मी खाते. कारण ते आरोग्यदायी आणि शुगर फ्री असतात.  आपलं आरोग्य जपणं हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे सर्वांनी पहिलं प्राधान्य आपल्या आरोग्यासाठी अन् कुटुंबाच्या आरोग्यासाठी दिलं पाहिजे. 

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स...
  • व्यायाम आणि आहार या दोन गोष्टी प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.

  • आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी चांगली जीवनशैली जगणे गरजेचे आहे.

  • दररोज न चुकता आपल्या स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी दिला पाहिजे. या वेळेत कोणता ना कोणता तरी व्यायाम केलाच पाहिजे. किमान चालले तरी पाहिजे.

  • आपल्या आहारामध्ये फळे, भाज्या आणि कडधान्याचा समावेश केला पाहिजे.

  • आहार आणि व्यायामाबरोबरच दररोज आठ तास निवांत झोपले पाहिजे. झोपण्यापूर्वी एक तास अगोदर मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा. त्यामुळे त्याचा डोळ्यांनाही त्रास होणार नाही. झोपेतून उठल्याबरोबर लगेचच डोळ्यांसमोर मोबाईल आणू नये.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.