सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर September 28, 2024 11:13 AM

Nagpur Savner Assembly Constituency: सावनेर : काँग्रेस (Congress) नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या सावनेर मतदारसंघावर (Savner Vidhan Sabha Matadarsangh) देशमुख कुटुंबानं (Deshmukh Family) दावा केला आहे. काँग्रेसचे माजी उप्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख (Ranjeet Deshmukh) यांचा मुलगा अमोल देशमुख (Amol Deshmukh) यांनी सावनेरमधून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघावर काँग्रेसमधूनच वेगळी दावेदारी करण्यात आली आहे. आणि ही दावेदारी दुसऱ्या- तिसऱ्या कुणी नाही, तर केदार घराण्याशी जुनं राजकीय वैर असलेल्या देशमुख कुटुंबातून करण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशुमख यांचे चिरींजीव डॉ. अमोल देशमुख यांनी सावनेर मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागत, मी केदार - देशमुख या अत्यंत जुन्या राजकीय वादावर पडदा टाकून सुनील केदार यांच्यापुढे मैत्रीचा हात ठेवल्याचं मत व्यक्त केलं आहे. सुनील केदार यांच्यासोबत पूर्वी स्थानिक निवडणुकांमध्ये मी सहकार्यानं काम केलं आहे. राजकारणात एकेकाळी केदार - देशमुख वाद होता. मात्र मी केदार यांच्यासमोर मैत्रीचा हात दिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांना मदत केली आहे. अशा रीतीने अनेक पातळ्यांवर सुनील केदार यांच्यासोबत काम केलं आहे. बँक घोटाळ्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या तरी ते निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत. पुढे काय होईल, हे देखील अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी मला लहान भावासारखं मानून काँग्रेस पक्षाचा सहकारी मानून मोठ्या मनानं संधी द्यावी, अशी अपेक्षा असल्याचं अमोल देशमुख म्हणाले आहेत. 

जेव्हा केव्हा संधी मिळेल, सुनील केदार यांना भेटणार आणि बोलणार असंही अमोल देशमुख म्हणाले आहेत. दरम्यान, सावनेर आणि देशमुख कुटुंबाचंही जुनं नातं असून माझे वडील रणजीत देशमुख यांचा तो जुना मतदारसंघ आहे. वडिलांचे अनेक कार्यकर्ते आजही सावनेरमध्ये असून माझ्या सोबत काम करणारे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं तिथे आहेत. त्यामुळे सावनेर मतदार संघावर मला माझा हक्क वाटतो, पक्षश्रेष्ठी न्याय करतील, अशी अपेक्षा असल्याचंही अमोल देशमुख म्हणाले आहेत. 

विधानसभा निवडणूकीत सावनेरमध्ये दोन भाऊ आमने-सामने 

दरम्यान, सावनेर अमोल देशमुख यांचे मोठे बंधू आणि सध्या भाजपचे नेते असलेल्या आशिष देशमुख यांचाही जुना मतदारसंघ आहे. आशिष देशमुख हे देखील सावनेरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतात, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे अमोल देशमुख यांनी काँग्रेसमधून सावनेरवर दावा केल्यानं दोन्ही भावांमध्ये लढत होण्याचीही शक्यता आहे. मात्र, आशिष देशमुख आधीच सावनेर मतदारसंघ सोडून गेले आहेत. त्यानंतर सुनील केदार यांच्या बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयीन निर्णय आल्यानं मी सावनेरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

आशिष देशमुख सावनेरमधून भाजपचे उमेदवार राहतील का? याचा निर्णय त्यांचा पक्ष करेल. काँग्रेस पक्षाचा निर्णय काँग्रेसचे नेते करतील. भविष्यात काय होईल, हे आज सांगता येणार नाही.  त्यामुळे सावनेरमध्ये दोन्ही भावांमध्ये राजकीय संघर्ष होईल का? हे पक्षश्रेष्ठी आणि देवावर सोडतो, देव रस्ता काढेल त्याप्रमाणेच पुढे जाऊया अशी प्रतिक्रिया अमोल देशमुख यांनी दिली आहे. माझ्या वडिलांचा आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा माझ्या पाठीशी असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. 

कोण आहेत डॉ. अमोल देशमुख? आणि त्यांच्या सावनेरवरील दाव्याचा राजकीय महत्व काय?

अमोल देशमुख काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरींजीव. वैद्यकीय तज्ज्ञ असलेले डॉ. अमोल देशमुखांनी जगातील नामांकित रुग्णालयात तसेच युद्द आणि यादवी असलेल्या देशात वैद्यकीय सेवा दिली आहे. 2012 पासून ते काँग्रेसच्या वेगवेगळ्या संघटनात्मक कामांमध्ये सक्रिय असल्याचा त्यांचा दावा आहे. काँग्रेसच्या अडचणीच्या काळातही काँग्रेस सोडली नाही, त्यामुळे पक्ष श्रेष्ठ संधी देतील अशी पक्षाकडून अपेक्षा आहे. 

सावनेर मतदारसंघ अमोल देशमुखांचे वडील रणजित देशमुखांचा जुना मतदारसंघ आहे. रणजित देशमुख सावनेर मधून 1985 आणि 1990 असे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सावनेरमधून अमोल देशमुख यांचे मोठे बंधू आशिष देशमुख यांनी ही भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. आता अमोल देशमुख सावनेरसाठी इच्छुक असल्यानं वडिलांच्या जुन्या मतदारसंघात दोन्ही भाऊ वेगवेगळ्या पक्षातून समोरासमोर येण्याची दाट शक्यता आहे. सावनेरवरील अमोल देशमुखांच्या दाव्यानं सुनील केदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता केदार - देशमुख राजकीय संघर्ष नव्या वळणावर जाईल की कायमचा मिटेल? असा प्रश्न सावनेरमध्ये चर्चेत आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.