मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराचं उद्धव ठाकरेंकडे साकडं; राष्ट्रवादीच्या जागेवर ठोकला दावा
अमोल मोरे, एबीपी माझा September 28, 2024 10:43 AM

Konkan Politicle Updates : चिपळूण : आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आता थेट माजी आमदारानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याकडे मागणी केली आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार राहिलेले आणि सध्या ठाकरे गटासोबत असलेल्या सुभाष बने (Subhash Bane) यांनी ही मागणी केली आहे. चिपळूण - संगमेश्वरची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडावी. याशिवाय उमेदवार म्हणून रोहन बने यांच्या नावाचा विचार करावी, अशी मागणी सुभाष बने यांनी केली आहे.

रोहन बने (Rohan Bane) हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. तर, सुभाष बनेंनी याच मतदारसंघाचं नेतृत्व देखील केलं आहे. त्यामुळे या मागणीमुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) जागेवरून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. दरम्यान, या ठिकाणी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असलेले शेखर निकम हे विद्यमान आमदार आहेत. अगदी काहीच दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांनी या चिपळूणचा (Chiplun) दौरा केला. यावेळी दोन्ही बाजुनं जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं गेलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आता या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्यात आठवड्यात आदित्य ठाकरे यांचा देखील दौरा खेड, दापोलीसह मंडणगड भागात होणार आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे देखील याची दखल घेत काही भाष्य करतील का? याची चर्चा देखील आता यानिमित्तानं सुरू होणार आहे. 

काय म्हणाले सुभाष बने? 

चिपळूण - संगमेश्वर या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. खेडेकर, भास्कर जाधव यांच्यासह मी अर्थात सुभाष बने, सदानंद चव्हाण यांनी या मतदार संघाचं नेतृत्व केलं आहे. शिवसेनेची ताकद देखील या मतदारसंघात आहे. त्यामुळे जागा वाटप करताना सदरचा मतदारसंघ शिवेसेनेला सोडला जावा. शिवाय, उमेदवार म्हणून रोहन बने यांच्या नावाचा विचार करावा. रोहन बने यांनी केलेलं काम देखील उल्लेखनिय आहे. चिपळूणच्या पुरात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे रोहन बने यांचा विचार केला जावा. याबाबतची मागणी आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, असं बने यांनी मतदारसंघावर दावा करताना म्हटलं आहे. 

जाधव देखील इच्छुक

दरम्यान, गुहागरचे आमदार आणि शिवसेनेचे नेते हे देखील या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. जाधव यांनी देखील यापूर्वी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. याशिवाय, आपला मुलगा विक्रांत जाधव याला देखील गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी देखील जाधव प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेले शेखर निकम हे सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत यादव यांची तयारी सुरू आहे. प्रशांत यादव हे काँग्रेसचे तालुका प्रमुख राहिले आहेत. त्यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित असून जागा वाटपाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे. पण, ठाकरे गटानं केलेल्या मागणीमुळे या ठिकाणची चुरस आणखी वाढली आहे. 

 

मुलाला तिकीट मिळावं म्हणून कोकणातील माजी आमदार सक्रीय; थेट 'मातोश्री'वर फिल्डिंग!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.