धर्मवीर-2 सिनेमा म्हणजे आपली गद्दारी लपवण्यासाठी अन् चांगली इमेज दाखवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न;केदार दिघेंचा घणाघात   
अभिषेक मुठाळ September 28, 2024 07:13 PM

Kedar Dighe on Dharmaveer 2 : बहुप्रतिक्षित धर्मवीर-2 (Dharmaveer 2) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चपासून ते चित्रपट  प्रदर्शित झाल्यापर्यंत या सिनेमावरून राज्याचे राजकारण तापले आहे. त्यात अनेकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचाही सिनेमा बघायला मिळाला आहे. त्यातच आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी देखील या चित्रपटावर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना (Eknath Shinde) आणि सरकारवर घणाघात केला आहे. धर्मवीर चित्रपट जसा मध्यंतरानंतर फेक होता, त्याच पद्धतीनं धर्मवीर-२ मध्ये आपली इमेज सांभाळण्यासाठी हा चित्रपट बनवला गेलाय. धर्मवीरमध्ये काही क्षण योग्य होते, मात्र धर्मवीर -2 मध्ये आपली गद्दारी कशी लपवावी आणि चांगली इमेज कशी दाखवावी,  याचा केविलवाणा प्रयत्न केला गेल्याची टीका केदार दिघे (Kedar Dighe) यांनी केली आहे.  

संजय शिरसाट यांनी पुरावे आणावे, मी कोर्टात जायला तयार-केदार दिघे

पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, धर्मवीरमध्ये शेवटचा सीन होता ज्यात एकनाथ शिंदे हे खांद्यावर घेऊन जात आहेत, मग शिरसाट यांचा रोख कोणाकडे आहे? मंत्रीपद मिळवणाऱ्या संजय शिरसाट यांना महामंडळ मिळालं म्हणून नैराश्येतून ह्या गोष्टी येतायत का? लोकांना संभ्रमात ठेवून निवडणुका आल्या की असे प्रश्न उपस्थित करायचे प्रयत्न सध्या सुरू आहे. मी अग्नी दिलाय दिघे साहेबांना, मी दिघे साहेबांचा पुतण्या आहे. मी अनेकदा विचारलंय ज्यांनी ज्यांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांना.

आज मी उभ्या महाराष्ट्राच्या साक्षीने विचारतो संजय शिरसाट यांनी पुरावे आणावे, मी कोर्टात जायला तयार आहे. मी पोलिसांमध्ये देखील जायला तयार आहे. नुसती चर्चा करायची, त्यामुळे तुमचा हेतू काय? तुम्हाला बाजूला सारलंय म्हणून असे प्रश्न निर्माण करायचे. तुमच्या दैवताबद्दल अशा घटना घडत होत्या, तर मग तुम्ही काय करत होतात? सर्व पदं उपभोगली, लाज वाटायला पाहिजे असे, म्हणत केदार दिघे (Kedar Dighe) यांनी  संजय शिरसाट यांच्यावर घणाघात केला आहे. तुम्हाला माहिती नव्हतं का नेता म्हणून, मंत्री म्हणून घात झाला होता तर? तेव्हा का बोलला नाही? स्वार्थाचे राजकारण तुम्ही करताय यावरुन हे दिसतंय, असेही ते म्हणाले. 

धर्मवीर बनवायचा असेल तर दरी खोऱ्यातील अनुभव वाचले गेले पाहिजे

स्वतः ची इमेज बिल्डअप करण्यासाठी, प्रपोगंडा करण्यासाठी आणि फेक नॅरेटिवेह सेट करण्यासाठी बनवलेला हा चित्रपट आहे. दिघे साहेबांचे संबंध हे वैयक्तिक होते, पक्षाच्या पलिकडचे देखील होते. त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाचं काम कर्तव्य म्हणून ते करत होते, चार चौघांमध्ये मिळून काम करणारे व्यक्तिमत्व ते नव्हतं. दिघे साहेब समजायचे असेल आणि धर्मवीर बनवायचा असेल तर दरी खोऱ्यातील अनुभव वाचले गेले, बोलले गेले तर तो चित्रपट रेखाटला जाऊ शकतो.

दिघे साहेबांचे नाव घ्यायचे आणि धर्मवीर नाव लावायचं आणि स्वत:च्या अपप्रचार करणाऱ्या गोष्टी दाखवायच्या, आनंद आश्रमाला स्वत:चं नाव लावलं, दहिहंडीसाठी स्वत:चे फोटो लावले, हे कधीही दिघे साहेबांनी केलं नव्हतं. तुमचा हेतू साध्य झाला, बस्स झालं. पण निवडणुका आहेत म्हणून त्यासाठी तुम्ही दिघे साहेबांच्या नावाचं राजकारण करत आहात, हे बरोबर नाही. हे लोकं कुठपर्यंत सहन करणार, लोकांना देखील कळायला लागलंय. मी ठाण्याच्या हिताचं आणि समाजकारणाचं काम करतोय आणि तसंच काम करत राहणार, असेही  केदार दिघे म्हणाले. 

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.