Musheer Khan : आठव्या वर्षी युवराजची विकेट, सचिनचे 2 रेकॉर्ड ब्रेक, मुशीर खानबाबत या गोष्टी माहितीयत?
GH News September 28, 2024 09:09 PM

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण रस्ते अपघात झाला. पंत या अपघातातून सुदैवाने बचावला. पंतची अपघातानंतरची स्थिती पाहून तो खेळू शकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र पंतने दणक्यात कमबॅक केलं आणि टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात योगदान दिलं. तसेच आता पंतने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक करत शानदार पुनरागमन केलं. पंतनंतर आता अंडर19 टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबईकर मुशीर खान याचा अपघात झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, मुशीर आणि त्याचे वडील नौशाद खान ईराणी ट्रॉफीआधी आजमगढ येथून लखनऊ येथे जात होते. तेव्हा त्यांच्या चारचाकीचा अपघात झाला. या दरम्यान चारचाकी 4-5 वेळा पलटली. या अपघातात मुशीरच्या मानेला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे मुशीरला पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे.

कोण आहे मुशीर खान?

यूपीतील आजमगढ येथे जन्मलेला मुशीर मुंबईत मोठा झाला. मुशीर मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खान हा मुशीरचा भाऊ आहे. मुशीरने वयाच्या 17 व्या वर्षी 2022 साली मुंबईकडून पदार्पण केलं. मुशीरने केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याची अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत निवड करण्यात आली. मुशीरने वर्ल्ड कपमधील 7 सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह 60 च्या सरासरीने 360 धावा केल्या.

सचिनचे 2 रेकॉर्ड ब्रेक

अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं. मुशीरने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात शतक ठोकत विजयात निर्णायक योगदान दिलं. मुशीरने यासह सचिन तेंडुलकर याला मागे टाकत रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतक करणारा युवा फलंदाज असा बहुमान मिळवला. तसेच मुशीरने दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणातील सामन्यात 181 धावांची खेळी केली. मुशीरने यासह सचिनचा पदार्पणातील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला. सचिनने दुलीप ट्रॉफीतील पदार्पणात 159 धावा केल्या होत्या.

मुशीरने वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंह याला आऊट करत छाप सोडली होती. मुशीरने 2013 साली कांगा लीग स्पर्धेआधी सराव सामन्यात सहभाग घेतला होता. त्या सामन्यात युवराजही होता. तेव्हा मुशीरने युवराजला आऊट केलं होतं.

दरम्यान मुशीरला या अपघातामुळे क्रिकेटपासून पुढील काही आठवडे दूर रहावं लागणार आहे.त्यामुळे मुशीरला इराणी ट्रॉफीसह आगामी रणजी स्पर्धेलाही मुकावं लागण्याची शक्यता आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.