Musheer Khan Accident: मुशीरची तब्येत कशी? डॉक्टरांनी काय सांगितलं?
GH News September 28, 2024 11:09 PM

भारतीय क्रिकेटपटू सरफराज खान याचा भाऊ क्रिकेटर मुशीर खान याचा रस्ते अपघात झाला. त्यानंतर मुशीरला लखनऊमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुशीरच्या अपघातानंतर एकच खळबळ उडाली. मुशीरला काय झालं? अपघात कशामुळे झालं? मुशीरला जास्त लागलं का? नक्की काय झालं? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित करण्यात आले. आता उपचारांनंतर मुशीर खानच्या तब्येतीबाबत रुग्णालयाने मेडीकल बुलेटीन जारी केलं आहे.

मुशीर आणि त्याचे वडील नौशाद खान कानपूरहून लखनऊला जात असताना पूर्वांचल एक्सप्रेसवर गाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला. मुशीर या अपघातात गंभीर जखमी झाला. त्यामुळे मुशीरला इराणी कप स्पर्धेत खेळता येणार नाही. इराणी ट्रॉफीतील सामन्यात मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया आमनेसामने असणार आहेत. हा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र मुशीर बाहेर झाल्याने मुंबईला मोठा झटका लागला आहे.

रुग्णालय प्रशासनाने काय सांगितलं?

मुशीर खान याची तब्येत आता स्थिर आहे. त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही.रस्ते अपघातानंतर मुशीरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुशीरला मानेला दुखापत झाली आहे. मुशीरवर अस्थीरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर धर्मेंद सिंह हे उपचार करत आहे. तसेच एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावरुन मुशीरच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.

Image

….तर एमसीए मुशीर खानला मुंबई आणणार

एमसीएच्या पोस्टमध्ये काय?

बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचं वैद्यकीय पथक मुशीरवर बारीक लक्ष ठेवून आहे. मुशीरला सर्वोत्तम उपचार देण्याचे प्रयत्न आहेत. एमसीएनुसार, मुशीर प्रवास करण्याइतका ठणठणीत झाल्यास, त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईत आणलं जाईल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.