नात्यात फसवणूक शिक्षा की माफी, बोल्ड ॲण्ड ब्युटिफूल
esakal September 28, 2024 10:45 PM
डॉ. सबिहा

वैवाहिक नात्यात प्रत्येकाचे काही प्राॅस्पेक्टिव्ह असतात. म्हणजे कोण चूक कोण बरोबर वगैरे... बायकोने खरं सांगायला हवं होतं. मग त्याने असं करायला हवं होतं... अशा प्रकरणात निसटलेला दुवा कुठला असेल, तर तो म्हणजे माफी. नात्यात अनवधानाने कोणी चूक केली, तर त्याला माफ करण्याचा मोठेपणा तुमच्यात किती आहे? किती मर्यादेपर्यंत तुमच्यात माफ करण्याची ताकद आहे, हेच खरं महत्त्वाचं ठरतं.

क सेक्स आणि रिलेशनशिप कोचच्या माझ्या प्रोफेशनमध्ये प्रत्येक वयोगटातील जोडपं माझ्याकडे येतं. सगळ्यात सीनियर क्लायंट माझ्याकडे आली होती. ती होती ७६ वर्षांची महिला. सर्वांना कुठे ना कुठे आपल्या नात्यातील चमक पुन्हा मिळवायची होती. नातं जुनं होतं जातं, तशी त्याची चमक जाते. मग त्याला पॉलिशिंग करावं लागतं, त्याला घासावं लागतं, त्याला स्वच्छ करावं लागतं... दसरा-दिवाळीला वर्षातून एकदा अख्ख्या घराची आपण साफसफाई करतो, तसंच नात्याचं असतं; पण त्यात एक मुद्दा सुटून जातो, की हे सगळं करत असतानाही काही नाती नाहीच खुलत, नाहीच फुलत. किती काहीही करा काहीच होत नाही.

आजचा माझा लेख एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आहे. तो म्हणजे, नात्यामध्ये सगळं काही असतानाही ते जिवंत का नाही वाटत? एक संसार म्हणून जे काही हवं ते सगळं आहे. बाहेरून तर सगळं चांगलं आहे; पण त्या जोडप्यालाच पूर्ण सत्य माहीत असतं की आत काहीच नाहीय. असं का?

आजची केस स्टडी एका ३२ वर्षांच्या विवाहित पुरुषाची आहे. त्याने एकट्यानेच मोठ्या धाडसाने माझं सेशन बुक केलं होतं. ‘मला दोन आठवड्यांनंतर अपॉइंटमेंट मिळाली आहे आणि आज मी तुमच्यासमोर आहे म्हणजे मलाच एक मोठा गड जिंकल्यासारखं वाटतंय...’ असं त्याने मला सांगितलं. मी नेहमीप्रमाणे त्याचं ऐकत होते. माणसाचे सुरुवातीचे काही हावभाव, देहबोली, भावना आणि एकंदरीत टोनवरून आमच्या लक्षात येतं, की नक्कीच इथे खूप काही सांगण्यासारखं आहे. आमच्या सेशनला सुरुवात झाल्यानंतर तो बोलू लागला. तो म्हणाला, ‘माझ्या लग्नाला आठ वर्षे झाली. मला पत्नी आणि तीन मुली आहेत. आमचा व्यवसाय खूप चांगला चालला आहे; पण आज मी जे काही सांगणार आहे ते गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच मी कोणासमोर तरी बोलतोय. माझं ॲरेंज मॅरेज झालं. जोडीदार मला शिकलेली आणि माझ्या व्यवसायात साथ देणारी हवी होती. लग्नाआधी मी त्या मुलीला भेटलो. मी मोकळेपणाने माझी बाजू मांडली. तिने ती ऐकून घेतली; पण फार काही बोलली नाही. मग आमचं लग्न झालं.’ लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत सांगताना मात्र त्याचा आवाज बदलला. तो सांगत होता, ‘मी जरी शिकलो-सवरलेला असलो तरी लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या मनात एक प्रश्न होता तो म्हणजे, पहिल्यांदा सेक्स करताना रक्तस्त्राव होईल का? मला कल्पना होती, की गरजेचं नाहीय की रक्तस्राव व्हायलाच हवा. रक्त आलं म्हणजे मुलगी व्हर्जिन असंही नाही; पण माझ्या डोक्यात होतं ते. सेक्स करताना माझ्या बायकोला रक्तस्राव झाला नाही म्हणून मी सहज तिला विचारलं, की हे तुझं पहिल्यांदाच आहे का? त्यावर ती म्हणाली, की नाही हे पहिल्यांदा नाहीय.

तिचं म्हणणं होतं, की आधी एकदा घरी एका नातेवाइकासोबत तिचे संबंध आले होते. मी हादरून गेलो आणि पुढे आमच्यात काहीच झालं नाही. तिचं बोलणं माझ्या डोक्यातून जाईना. मला कुठेतरी वाटत होतं, की हे पूर्ण सत्य नाहीय. त्या गोष्टीला महिना झाला. त्या महिनाभरात आमच्यात शारीरिक संबंध आले नाहीत. ती ओढच माझ्यात राहिली नव्हती. माझ्या डोक्यात सतत तोच विचार येत होता. महिन्यानंतर मी माझ्या बायकोला प्रश्न विचारला, की तू मला सगळं खरंच सांगितलं आहेस ना? त्यावर ती म्हणाली, की नाही ते पूर्ण सत्य नव्हतं आणि मला पुन्हा धक्का बसला. लग्नाआधी एका मुलासोबत नातं असल्याचं तिने स्पष्ट केलं. ती म्हणाली, आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचो. आमचे दोन-तीनदा शारीरिक संबंधही झाले. मी त्याला लग्नाबद्दल विचारायचे; पण त्याबाबत तो काही बोलायचा नाही. एके दिवशी मी अचानक त्याच्या घरी गेले आणि त्याला लग्नाची गळ घातली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं माझ्या लक्षात आले. त्याचं आधीच लग्न झालं होतं. त्याला दोन मुलंही होती. त्यादरम्यान मला तुमचं स्थळ आलं आणि मी होकार दिला... अशा प्रकारे माझ्या बायकोने मला सारं खरं सांगून टाकलं; पण तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. आज लग्नाच्या आठ वर्षांनंतरही ती गोष्ट डोक्यातून जात नाही. आमच्यात पुन्हा शारीरिक संबंध आले. जेव्हा जेव्हा संबंध आले, तेव्हा तेव्हा तिला गर्भधारणा झाली. आता आम्हाला तीन मुली आहेत. माझी तिसरी मुलगी तर नुकतीच जन्माला आलीय. एक महिना माझी बायको बाळंतीण आहे. ती माहेरी आहे. मी त्या विचाराने इतका कंटाळलो आहे की, मी माझ्या तिसऱ्या मुलीला बघायलाही गेलेलो नाहीय. मला इच्छाच होत नाहीय. मला नाही वाटत, की मी हे सगळं अजूनही सहन करू शकेन...’ त्यावर मी त्याला प्रश्न केला, की आठ वर्षांत तुम्ही काय काळजी घेतली? तुम्ही एखाद्या तज्ज्ञांशी किंवा एकमेकांशी संवाद साधला का? त्यावर तो म्हणाला, की आम्ही जेव्हा बोलत असू तेव्हा मी तिला तू असं का केलं, एवढा एकच प्रश्न विचारायचो. मग मी त्याला विचारलं, की गेल्या आठ वर्षांत तुम्हाला कधी जाणवलं का तिने पुन्हा तुम्हाला फसवलं वगैरे? त्यावर तो म्हणाला, की फसवण्याचा प्रश्नच येत नाही. कारण जवळजवळ मी तिला नजरबंदेतच ठेवलं होतं. मधे चार ते पाच वर्षे मी तिला तिचा मोबाईलही दिला नव्हता. घर आणि ऑफिसच्या पलीकडे तिला विश्व नाही. मी एका अर्थी तिला शिक्षा देतो; पण त्यानेही मला समाधान मिळत नाही. माझ्या डोक्यातून ते काही केल्या जात नाही.

माझ्यासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं, की तुम्ही माझं सेशन बुक करता त्यामागचा तुमचा उद्देश काय? जेव्हा मी हा प्रश्न त्याला विचारला तेव्हा तो म्हणाला, मॅम हे सगळं ट्रिगर होतं मला... मग मी म्हटलं, आपण त्यात ट्रिगरवरच काम करू. ज्या गोष्टींनी तुम्ही ट्रिगर होता आणि मग ज्याची आठवण तुम्हाला होते तिथेच म्हणजे त्या मेमरीवरच काम करू आपण; पण त्याच्या पुढचा एक प्रश्न निर्माण होतो, की आपण त्या ट्रिगरवर काम केलं आणि त्या मेमरीशी संबंधित अर्थ आपण पुसून टाकले तरी हे सगळं का करायचं? त्यामागचा हेतू काय? कारण कुठल्याही कामात हेतू महत्त्वाचा असतो. आपण जेव्हा एखादी गोष्ट दुरुस्त करतो, तर ती का करतोय याची कल्पना हवी. समजा आपली गाडी खराब झाली, तर आपण ती दुरुस्त करू. खराब झालेले पार्ट बदलू. तुम्हाला गाडी चालवायची आहे म्हणून तुम्ही ती दुरुस्त करताय की तुम्हाला ती विकायची आहे म्हणून? की ती गॅरेजमध्ये पडली आहे, तर दुरुस्त करून ठेवू, असे काही उद्देश असतील, तर ते क्लिअर व्हायला हवेत... मी असे काही मुद्दे त्याच्यासमोर मांडले. त्यावर त्याचं म्हणणं होतं, ‘मॅम मला आता आमचं नातं पुढे न्यायचं नाहीय. तुमच्याकडे येण्याआधी मी काल माझ्या वकिलाकडे जाऊन माझं विल बनवून आलोय. कारण माझ्या डोक्यातून ते जात नाही.’ मी त्याला सवाल केला, की नक्की ट्रिगर काय होतं? पहिल्या रात्रीची आठवण? तर तो म्हणाला, ‘हो. तिने पहिल्या रात्री सांगितलेलं सगळं माझ्या डोक्यात येतं आणि नकोसं वाटतं. मी माझ्या बायकोसोबत कुठेच फिरायला जात नाही. मला एकटं वाटतं आणि मग ते सगळे विचार मनात पुन्हा डोकावतात.’ पहिल्या रात्रीची काय आठवण आहे तुम्हाला, असा प्रश्न मी त्याला केला. न्यूरोलिंगवेस्टिक म्हणजे माणसाचा मेंदू कसा कार्यरत आहे, हे तपासणं माझं काम असतं. त्या संदर्भातले काही प्रश्न मी त्याला विचारले तेव्हा मला जाणवलं, की पहिल्या रात्रीची ती कटू आठवण त्याच्या चांगलीच लक्षात होती. त्याने पिवळा शर्ट घातला होता.

बायकोने मोरपंखी रंगाची साडी नेसली होती. मी सहजच त्याला तो प्रश्न विचारला होता. त्यावर तो म्हणाला, ‘मॅडम मी तो शर्ट आणि ती पँट त्या रात्रीच जाळून टाकली. बायकोला त्याबाबत काही माहीत नाही.’ तिने नेसलेल्या साडीचं काय झालं, असं मी विचारलं तेव्हा तो म्हणाला, की ती साडी माझी बायको आज आठ वर्षांनीही नेसते. मी तिला शंभरदा सांगितलं, तरीही ती तीच साडी नेसते आणि ते बघून मला खूप अस्वस्थ वाटतं... त्यानंतर तो अगदी ओक्साबोक्शी रडायला लागला. कारण त्याच्यासाठी तो सारा प्रकार आठ वर्षे जुना नव्हताच. त्याच्यासाठी ते सगळं जणू काही सत्तर एमएमच्या पडद्यावर आताच सुरू होतं. किती वेदनादायी होतं ते त्याच्यासाठी. माझा निष्कर्ष असा निघाला, की तो काही माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा सल्ला घ्यायला आलेला नव्हता. कारण ती गाडी त्याला चालवायचीच नव्हती. आठ वर्षे त्याने ती रखडत रखडत चालवली होती. आता तो लढा पती-पत्नीने कागदोपत्री विभक्त होण्यापर्यंत पोहोचला होता. कारण त्यांचं लग्न कधी जुळलंच नव्हतं, तर मग ते विभक्त काय होणार? म्हणजे त्यांच्या लग्नात काहीच नव्हतं. प्रत्येकाचे काही प्राॅस्पेक्टिव्ह असतात. म्हणजे कोण चूक कोण बरोबर वगैरे... बायकोने खरं सांगायला हवं होतं. मग त्याने हे करायला हवं होतं, ते केलं पाहिजे होतं. त्या साऱ्या प्रकरणात निसटलेला कुठला दुवा असेल, तर तो म्हणजे, नाही ना माफ करता येत आहे मला आणि नाही ना ते सारं विसरता येत आहे,

तर तेच खरं आहे. त्याचा स्वीकार कर. मी सुरुवातीला जो मुद्दा मांडला होता तो आहे माफ करण्याचा. नात्यामध्ये एखाद्याला माफ करण्याचा मोठेपणा तुमच्यात किती आहे? समोरचा कोणत्या स्तरावरची चूक करू शकतो हा मुद्दाच नसतो. किती मर्यादेपर्यंत तुमच्यात माफ करण्याची ताकद आहे, हे महत्त्वाचं. कारण जेव्हा तुम्ही विशी-पंचविशीत एखाद्याशी लग्न करता याचा अर्थ तुम्ही पुढची २५ वर्षे एकपतित्व आणि एकपत्नित्वाच्या संबंधासाठी वचनबद्ध असता.

आपल्याकडे लग्नसंस्था एकपतित्व-एकपत्नित्व आणि वचनबद्धतेवर आधारित आहे. आपण सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही एका आदर्श पती-पत्नित्वाच्या नात्याने जोडले गेलो आहोत. म्हणजे एका जोडीदारासोबत आपण अवघं आयुष्य घालवणार आहोत. तसं वचनच आपण एकमेकांना दिलेलं असतं. आपण खोटं नाही बोलणार, आपण जोडीदाराची फसवणूक नाही करणार, विवाहबाह्य संबंध नाही ठेवणार... पण मग तसं झालं आणि त्याची जाणीवही झाली, की आपलं चुकलंय... जे काही असेल ते तुम्ही खरं सांगता आहात मग तुमच्यात तेवढा मोठेपणा आहे का समोरच्याला माफ करायचा? आणि हो माफ केल्यावर तुम्ही ते सारं विसरू शकता? कारण नात्यात जोडीदाराला शिक्षा देत राहणं, नात्यात अबोला ठेवणं आणि ते फक्त निभावणं योग्य होणार नाही. त्या मुलीची जी काही आधीची रिलेशनशिप होती जी तिने लपवली आणि मग पहिल्या रात्री आपल्या पतीला त्याबाबत सांगितलं... काही महिन्यांनंतर सांगितलं ही झाली वस्तुस्थिती.

मला इथे त्या वस्तुस्थितीबाबत बोलायचं नाहीय, तर तुमच्या क्षमतेबद्दल काही सांगायचंय. तुमच्यात किती क्षमता किंवा ताकद आहे समाजाला सामोरं जाण्याची? मग इथे प्रश्न निर्माण होतो, की जर लग्नाआधी तिला नाही खरं बोलता आलं तर गेल्या आठ वर्षांपासून तुम्ही तरी ते केलंय का? तुम्हाला तरी खरं बोलता आलंय का? तुमचं एक सत्य तुम्हीही दडवून आहातच ना. तिचं सत्य तुम्ही विचारलं आणि तिने खरं सांगितलं. तुमचं सत्य कुणी विचारणारही नाही आणि विचारलं तर ते मांडण्याची तुमच्यात ताकद आहे का? इथे मुळात माफीचा मोठा मुद्दा मला माझ्या लेखातून मांडायचा होता. मला माफ करता नाही आलं, मला विसरता नाही आलं आणि त्याची मी किंमत भोगतोय. खरं तर आमच्या सेशनमध्ये त्या क्लायंटला माझा मुद्दा खूप चांगल्या प्रकारे समजला होता. त्यामुळे मला खात्री आहे, की पूर्ण विचारांती आणि जागरूक राहूनच तो पुढील निर्णय घेईल. आपण माणूस म्हणून लग्न करतो ना मग जनावर बनून त्या संबंधातून बाहेर नका पडू. समोरच्याकडून चूक झाली, तुम्हाला ती मान्य नाही आणि तुम्हाला त्यासाठी माफ करता येत नाहीय, तर आपण परस्पर सहमतीने अगदी समाधानाने माणसांसारखे लग्नबंधनातून बाहेर पडू. अशा लग्नात पुढे एकत्र राहायचं असेल, तर त्यासाठी आपण आपल्या क्षमतेवर काम करू. हीच आमच्या सेशनची जादू आहे, की इथे बसल्यावर तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव होते. प्रत्येक नातं हे सारख्या मर्यादांवर चालत नाही. जिथे नात्याचं वय वाढतं, नात्यांमध्ये जसे चढ-उतार येतात त्या हिशेबाने जोडीदाराला आपल्या क्षमतांवर काम करावं लागतं आणि तीच खरी गंमत असते.

(लेखिका प्रसिद्ध ‘सेक्स आणि रिलेशनशिप कोच’ आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.