Leopard Junnar: बिबट्याच्या बचावासाठी शेतकऱ्याची नवी संकल्पना, जुन्नर मध्ये मानव बिबट संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र
esakal September 29, 2024 04:45 AM

नारायणगाव, ता. २८ : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानव बिबट संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. मानव व पाळीव प्राण्यांवर वाढलेले हल्ले विचारात घेता वन विभागाने सुरू केलेली बिबट जेरबंद करण्याची मोहीम कुचकामी ठरत आहे. यामुळे शासनावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनीच आपल्या कुटुंबाचे बिबटसह इतर वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

याच संकल्पनेतून शेतावर वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांनी घराभोवती सुमारे दहा फूट उंचीची लोखंडी जाळी लावून घराचा परिसर संरक्षित करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे बिबट्याच्या हल्ल्यापासून कुटुंबाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. मात्र, यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दीड ते दोन लाखांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

जुन्नर तालुक्यात २००१ मध्ये सुरू झालेला मानव बिबट संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मागील २४ वर्षांत सुमारे ५० जणांचा मृत्यू झाला. सुमारे १६० जण जखमी झाले आहेत. मागील आठ महिन्यांत तालुक्यातील आळे, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी, शिरोली खुर्द, तेजवाडी येथील पाच जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यातील दोन मुलांना घराच्या अंगणातून बिबट्याने उचलून नेले आहे. बिबट हल्ल्याच्या घटनांचा अभ्यास केल्यास उघड्यावर झोपणे, शेतात शौचालयाला जाणे, अंगणात बसणे, शेतात वाकून काम करणे या कृतीची बिबट्याने संधी साधली आहे.

तालुक्यात ऊस शेतीबरोबरच बागायती क्षेत्र जास्त असल्याने व बहुतेक शेतकरी शेतावरच घर करून राहतात. शेतकऱ्यांना रोज बिबट्याशी संघर्ष करून स्वतःचा जीव धोक्यात टाकून शेतीच्या मशागतीची कामे करावी लागते. बारमाही पिके असलेल्या नारायणगाव वनपरिक्षेत्रातील नारायणगाव, वारूळवाडी, नारायणवाडी, मांजरवाडी, वळणवाडी, आर्वी, येडगाव, शिरोली, तेजवाडी या बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढली आहे.

बंदिस्त गोठ्यातील पाळीव प्राण्यांवर रोज बिबट्याचे हल्ले होत आहेत. एकटे किंवा जोडीने फिरणारे बिबटे आता दोन ते तीन बछड्यांसह फिरताना दिसतात. मानववस्तीपासून दूर राहणारे बिबटे आता थेट शहरी भागात रात्रीचे फिरताना दिसतात. तीन ते चार महिने वय असलेल्या बछड्यांची संख्या वाढली असल्याचे निरीक्षण वनविभागाकडून नोंदविले आहे.


वनविभागाचे अधिकारी कर्मचारी हतबल

बिबट्याचा वन्य जीव श्रेणी एकमध्ये समावेश असल्याने वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बिबट्याला जेरबंद करणे, अन्यत्र सोडणे, व्यक्ती व पाळीव प्राणी जखमी अथवा मृत झाल्यास आर्थिक मदत व प्रबोधन करणे, या व्यतिरिक्त बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करू शकत नाहीत. वाढलेली बिबट संख्या व शेतकरी, राजकीय व्यक्ती यांच्याकडून होणारी मानहानीमुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी हतबल झाल्याचे दिसून येते.

शासनाने अनुदान दिल्यास सर्वांना फायदा

घराभोवती रोज बिबट्याचा वावर असतो. बिबट्याच्या हल्ल्यात तीन पाळीव कुत्रे मृत झाले आहेत. एका पाळीव कुत्र्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडविण्यात यश आले. घरातील लहान मुलांना बिबट्यांपासून जास्त धोका असल्याने सुमारे दोन लाख रुपये कर्ज काढून घराच्या अंगणासमोर लोखंडी जाळी लावून घर संरक्षित केले आहे. शेतातील घरा सभोवताली जाळी लावण्यासाठी शासनाने अनुदान दिल्यास सर्व शेतकऱ्यांना ही उपाययोजना करता येईल, असे रोहन पाटे, जयेश कोकणे यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.