Marathi Kavita : चाहूल
esakal September 29, 2024 06:45 AM

-आशिष निनगुरकर

एक चाहूल लागते

कुठे काही घडते

दिवसाचे सारे गणित

मग बदलू लागते...

पण कुणी जवळ नसते

मन खूप हुरहुरते

आपल्याच नशिबी

घोडे का अडते!

वेळेचे हे असे गणित

कधीच उमजत नाही

अंधार दाटून येतो

काही सुचत नाही...

हे असे कधी घडते

सांगता येत नाही

मग मनातले दुःख

मनातच रुतून राही

पण काळजाच्या आत

असते एक अदृश्य रेषा

भावनांची समज...

सुखाची परिभाषा

आपला योग्य दिवस

मग सुखदपणे येतो

आपण तयार राहावे

आनंद भरून वाहतो

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.