जागतिक हृदयदिनानिमित्त संस्मरणीय आठवण
esakal September 29, 2024 08:45 AM

-डॉ. सुधीर भाटे, कार्डिअॅक सर्जन
मी व माझी पत्नी विजया भाटे अनुभव ट्रॅव्हल एजन्सीमार्फत २६ जून २०१५ मध्ये स्कॅन्डिनेव्हियात गेलो होतो. आमचा १७ जणांचा ग्रुप होता. कोल्हापूरचा माझा मित्र डॉ. सुधीर देवधर व त्याची पत्नी माणिक हेदेखील बरोबर होते. आमच्या ग्रुपमध्ये वयाने सर्वांत मोठे बोंडाळे हे ७७ वर्षांचे व त्यांची पत्नी ७५ वर्षांची अशी एक जोडी होती. १० दिवसांची आमची सहल संस्मरणीय झाली. ज्या विशिष्ट गोष्टीसाठी आम्ही गेलो होतो ती म्हणजे ‘मध्यरात्रीचा सूर्य’ आम्हाला फार छान बघता आला. सूर्य मावळल्यासारखा वाटतो व काही क्षणातच परत उगवू लागतो, हे आमच्यासाठी आश्चर्य होते.

आमचा परतीचा प्रवास सहा जुलैला ‘तुर्की एअरलाइनने’ इस्तंबूलपासून सुरू झाला. सायंकाळी सात वाजता आमच्या विमानाने इस्तंबूलहून मुंबईकडे जाण्यासाठी उड्डाण केले. मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास आमच्या ग्रुपमधील बोंडाळे यांना त्यांचे पती बोलायचे एकदम थांबल्याचे जाणवले. त्यांची मान बोंडाळे यांच्या खांद्यावर झुकली होती. त्यांनी लगेच त्यांच्या मागे बसलेल्या डॉ. सुधीर देवधर यांना सांगितले. त्यांनी तपासणी केली, तेव्हा त्यांच्या नाडीचे ठोके लागत नव्हते. त्यांचा श्वास थांबला होता व ते निपचित झाले होते.
बोंडाळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉ. देवधरांच्या लक्षात आले. त्यांनी एअर होस्टेसला सांगितले. विमानात वैद्यकीय आणीबाणीची घोषणा झाली. डॉ. देवधर यांनी एअर होस्टेसमार्फत मला ताबडतोब यायला सांगितले. पॅन्ट्रीमध्ये एक घोंगडी पसरून त्यावर बेंडाळे यांना ठेवून मी लगेच त्यांना सीपीआर देऊन हृदयाचे कार्य चालू ठेवले. मानात एक लेडी भूलतज्ज्ञपण होती. तिने नाकावर मास्क ठेवून ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. त्यांना अॅड्रेलिन इंजेक्शन दिले. त्यांच्या हृदयाला मालिश सुरूच होती. हृदयाला शॉक देण्याच्या यंत्राचा वापर केला. भूलतज्ज्ञाने मानेजवळील पल्स लागत असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात बोंडाळे श्वास घेऊ लागले. एक मोठा चमत्कार झाला होता.
या संपूर्ण प्रकरणात मुख्य गोष्ट म्हणजे विमानातील चालकवर्ग अनुभवी होता. एव्हाना बोंडाळे यांचा श्वास, नाडी सर्व व्यवस्थित चालू होते. जवळचा कराची विमानतळे होते. पायलटने माझ्याकडे विचारणा केली की, इमर्जन्सी लॅंडिंगची गरज आहे का? कारण मुंबईला पोहोचण्यास अजून दोन तास लागणार होते. मी हो म्हटले. कराचीला विमान उतरविण्याची परवानगी मिळाली. पुढे चार दिवस बोंडाळे कराचीमधील एका रुग्णालयातून उपचार घेऊन मुंबईला सुखरूप परतले. त्यानंतर बोंडाळे यांनी तीन वर्षांनंतर पत्नीबरोबर श्रीलंकेचा प्रवास केला. उत्तम आयुष्य जगले. २०२३ मध्ये ८३व्या वर्षी न्युमोनियाने त्यांचे निधन झाले.

सीपीआर ही प्रक्रिया सर्वांना माहिती असावी, अशी गरज आता निर्माण झाली आहे. हॉर्टअटॅकमुळे रुग्ण दगावण्याचे मुख्य कारण म्हणजे म्हणजे हृदयाचे आकुंचन-प्रसरण कार्य थांबणे, त्या क्षणी कार्डिअॅक मसाज सुरू केला, तर त्या व्यक्तिची जगण्याची शक्यता खूपच वाढते. चमत्कार घडतात किंवा नाही मला माहीत नाही, पण योग्य प्रयत्न, योग्य वेळेस, योग्य प्रकारे केल्यास यश मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते. कार्डीॲक सर्जरीने मला हेच शिकवले. मित्रांनो हृदयाची काळजी घ्या. नियमित व्यायाम, नेमका आहार, नियमित तपासणी ही त्रिसूत्री तुमचे हृदय निरोगी ठेवेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.