संकीर्ण (६)
esakal September 29, 2024 10:45 AM

- मंजिरी धामणकर

जलाहतौ विशेषेण वैद्युताग्नेरिव द्युतिः।

आपदि स्फुरति प्रज्ञा यस्य धीरः स एव हि॥

अनुवाद : वीज लखलखे एकाएकी काळ्या मेघातुन जैसी बुद्धी चमके संकटात धीरोदात्ताची हो तैसी

अर्थ : काळ्या ढगातून लखलखती वीज चमकावी त्याप्रमाणे संकटकाळी ज्याच्या डोक्यात हुशारीची चमक झळकते तो खरा धीरोदात्त माणूस होय.

न जातु काम: कामानामुपभोगेन शम्यति।

हविषा घृतमन्नेव भूय एवाभिवर्धते॥

अनुवाद : उपभोगाने ना शमती इच्छा-आकांक्षा मनुजाच्या तूप घालता अग्निमध्ये भडके तो, तैशा वाढति त्या

अर्थ : इच्छित वस्तूंचा उपभोग घेतल्यानं मनातल्या इच्छा, वासना, कामना शांत (नाहीशा) होत नाहीत. उलट, तूप घातल्यावर अग्नी जसा जास्त भडकतो, तशा त्या आणखीच वाढतात.

वचनं शीलमाख्याति वपु: आख्याति भोजनम्।

आचार: श्रुतिमाख्याति स्नेहमाख्याति लोचनम्।।

अनुवाद : कळे शील ते वाचेने अन् भोजन देहाने कळते आचरणाने कळे सभ्यता, ममता डोळ्यांतुन कळते

अर्थ : माणसाचं बोलणं, शब्दांची निवड, शैली यावरून त्याचा स्वभाव, चारित्र्य कळतं. शरीरमान, हालचाली यांवरून भोजन (किती आणि कसं) याचा अंदाज येतो. समाजात वागण्याच्या रीतीवरून माणसाचं शिक्षण, संस्कार, सभ्यता यांची पारख होते आणि डोळ्यांतल्या भावांवरून मनातल्या स्नेहाची, मायेची जाणीव होते.

रविरपि न दहति तादृग् यादृक् दहति वालुका निकरः।

अन्यस्याल्लब्धपदो नीचः प्रायेण दुःसहो भवति॥

अनुवाद : सूर्यही भाजत नाही, जितकी तप्त वाळु चटका देई अन्यकृपेने पदी बसे तो नीच असह्य तसा होई

अर्थ : सूर्याने तापलेल्या वाळूचा जेवढा चटका बसतो तेवढा प्रत्यक्ष सूर्यकिरणांनी, कडक उन्हानंही बसत नाही. खरोखरच, दुसऱ्याच्या बळावर पद, प्रतिष्ठा प्राप्त झालेले नीच आपल्या अधिकाराच्या दुरुपयोगानं असह्य होतात.

अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन।

अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः।।

अनुवाद : पैशाने मिळते औषध, कधि ना लाभे आरोग्य परी पैसे देऊनि मिळति ग्रंथ, मिळते कष्टाने ज्ञान परी

अर्थ : पैशानं औषध विकत घेता येतं; पण आरोग्य कधीही पैसे देऊन मिळत नाही. पैशानं भरपूर पुस्तकं विकत घेता येतात; पण ज्ञान मात्र स्वतः अभ्यासानं, कष्टानं मिळवावं लागतं.

नभो भूषा पूषा कमलवनभूषा मधुकरो। वचोभूषा सत्यं वरविभवभूषा वितरणम्।।

मनोभूषा मैत्री मधुसमयभूषा मनसिजः। सदोभूषा सूक्तिः सकलगुणभूषा च विनयः।।

अनुवाद : सूर्य भूषवी आकाशा अन् कमळ शोभते भ्रमराने शोभे वाणी सत्याने अन् संपत्ती ती दानाने मानस शोभे मैत्रीने अन् ऋतु वसंत तो मदनाने सभेस शोभा वक्तृत्वाने, सर्व गुणांना विनयाने

अर्थ : सूर्य हा आकाशाचा अलंकार आहे. कमळांच्या उपवनाला भुंगा शोभा आणतो. खरं बोलण्यानं वाणी शोभून दिसते. विपुल संपत्ती दान करण्यानं सुंदर दिसते. मैत्री हा मनाचा अलंकार आहे. वसंत ऋतूमध्ये मदनाचं अस्तित्व शोभून दिसतं. सभेमध्ये चांगलं वक्तृत्व शोभून दिसतं. (तर) नम्रता सर्व गुणांना खुलवते.

श्लोकेन वा तदर्धेन पादेनैकाक्षरेण वा।

अबन्ध्यं दिवसं कुर्यात् दानाध्ययनकर्मभिः।।

अनुवाद : रोज शिकावा एक श्लोक वा अर्धा, पद, अक्षर एक दान, अध्ययन, सत्कर्माविण ना जावा दिनही एक

अर्थ : एखादा श्लोक, अर्धा श्लोक, श्लोकाचा एखादा तरी चरण किंवा किमान श्लोकाचं एखादं अक्षर शिकलो नाही, तसंच दान, अभ्यास अथवा सत्कार्य केलं नाही, असा एकही दिवस (वाया) जाऊ देऊ नये. (हे सदर लिहिताना माझा आणि वाचताना तुमचा दिवस सत्कारणी लागला म्हणायचा.)

प्रारम्भे लघुशिखरं ज्ञानं मोदकसदृशम्।

विस्तीर्णं तु प्रजानाय प्रज्ञां देहि गजानन।।

अनुवाद :मोदकापरी ज्ञानाचे ते टोक दिसे आरंभाला बुद्धि देई गणराया, त्याची व्यापकता जाणायाला

अर्थ : ज्ञान हे मोदकाप्रमाणे असतं, ज्याचं सुरुवातीला (वर वर पाहता) फक्त लहान टोक दिसतं; परंतु जसजसं खोलवर अभ्यासत जावं तसतशी त्याची व्यापकता लक्षात येते. असं विस्तार पावलेलं ज्ञान आत्मसात करण्यासाठी हे गजानना, आम्हाला बुद्धी दे.

(लेखिका ह्या भाषांतरकार, भाषाप्रशिक्षक, निवेदिका, तसंच एकपात्री कलावंत आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.