Sharad Pawar : तरुण पिढीला सोबत घेऊन सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू - शरद पवार
esakal September 30, 2024 08:45 AM

अकलूज(जि. सोलापूर) : सामान्य माणूस ते मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशा पदापर्यंत जाऊनही सत्ता डोक्यात न जाऊ देता जमिनीवर पाय ठेवून सुशीलकुमार शिंदे यांनी कार्य केले. आता आपल्याला थांबायचे नाही. तरुण पिढीच्या मागे ठामपणे उभे राहून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे. यासाठी आपणाला उदंड आयुष्य लाभो, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

अकलूज (ता. माळशिरस) येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन तसेच महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, प्रणिती शिंदे, ओमराजे निंबाळकर, विशाल पाटील, संजय देशमुख, नीलेश लंके, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, माजी आमदार नारायण पाटील, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘सुशीलकुमार यांच्या कार्य कर्तृत्वाबद्दल इंदिरा गांधी यांच्यापासून राहुल गांधींपर्यंत सर्वांनी सन्मान केला. परंतु त्यांच्या कार्याचा घरातील व्यक्तींकडून होत असलेला सन्मान हा वेगळा आहे. आता ८४ वर्षे वय डोक्यातून काढून टाका आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे. तरुण पिढी घडवायची आहे. तरुण पिढीच्या मागे ठामपणे उभे राहून सुसंस्कृत महाराष्ट्र तयार करायचा आहे. यासाठी आपणाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’’

धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रास्ताविक केले. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विशाल पाटील आदींनीही मनोगत व्यक्त केले. मविआचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...पवार पंतप्रधान म्हणून दिसले असते : शिंदे

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘पंतप्रधानपदी नरसिंहराव असताना शरद पवार संरक्षणमंत्री होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परत येण्यास नको होते. ते आज पंतप्रधान म्हणून दिसले असते. हा नियतीचा खेळ असतो. त्यांच्यामुळे मी आज विविध पदे भूषविली आहेत. मी ढोर गल्लीतला छोटा मुलगा आज पंतप्रधानांच्या बाजूला बसत आहे, हे फक्त शरद पवारच करू शकतात. मला सत्काराने बळ दिले.’’

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.