Share Market Closing: प्रॉफिट बुकींगमुळे बाजार कोसळला; सेन्सेक्स 1,200ने घसरला, निफ्टी 25,800वर
esakal October 01, 2024 04:45 AM

Share Market Closing Latest Update 30 September 2024: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह झाली. आज बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग झाली. सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी, सर्व निर्देशांकांत 1 ते 1.5 टक्क्यांची घसरण झाली.

आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 1272 अंकांच्या घसरणीसह 84,299 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 368 अंकांच्या घसरणीसह 25,811 अंकांवर बंद झाला. इंडिया VIX 7% वर होता. ऑटो, पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकही दिवसभर दबावाखाली राहिले.

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 5 शेअर्स वाढीसह तर 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये JSW स्टील 2.86 टक्क्यांच्या वाढीसह, NTPC 1.27 टक्क्यांच्या वाढीसह, टाटा स्टील 1.17 टक्क्यांच्या वाढीसह, टायटन 0.41 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 0.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

रिलायन्सचा शेअर 3.23 टक्के, ॲक्सिस बँक 3.12 टक्के, आयसीआयसीआय बँक 2.58 टक्के, नेस्ले 2.12 टक्के, टेक महिंद्रा 2.10 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.03 टक्के, मारुती सुझुकी 1.99 टक्के घसरणीसह बंद झाले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

बाजारात सर्वाधिक प्रॉफिट बुकींग बँकिंग शेअर्समध्ये झाले आहे. निफ्टी बँकही 857 अंकांनी घसरून बंद झाला. याशिवाय ऑटो आणि आयटी शेअर्समध्येही घसरण झाली.

फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्येही विक्री झाली. केवळ मेटल आणि मीडिया शेअर्स वाढीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण दिसून आली.

गुंतवणूकदारांचे 3.68 लाख कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप घसरून 474.25 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे मागील सत्रात 477.93 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 3.68 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.