Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू; काँग्रेस,'आप'सह विरोधी पक्षांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
esakal October 02, 2024 05:45 AM

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलिस ठाण्यातच उपोषणास सुरू केले आहे. राजधानीत आंदोलन करण्यासाठी येत असताना वांगचूक यांना पोलिसांनी सिंघू सीमेवर अडवले, यानंतर त्यांच्यासह कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले.

वांगचूक यांना बवाना पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस,‘आप’ आणि अन्य विरोधी पक्षांनी वांगचूक प्रकरणावरुन केंद्र सरकारवर टीका केली. केंद्रशासित प्रदेश लडाखला विशेष राज्याचा दर्जा दिला जावा, या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा वांगचूक यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी कूच केले होते.

मात्र कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी वांगचूक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सिंघू सीमेवर मध्यरात्री अडविले. याठिकाणी सर्वांना ताब्यात घेत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेले. आंदोलक दिल्लीत येऊ नयेत, यासाठी जंतरमंतर, राजघाटसह इतर ठिकाणचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दिल्लीत कलम १६३ लागू

दिल्लीत कलम १६३ लागू आहे. मोठ्या संख्येने जमावाला प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आलेल्या लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त रवीकुमार सिंह यांनी सांगितले.

लडाखचे खासदार हाजी हनिफा यांनी सिंघू सीमेवर येत पत्रकारांशी संवाद साधला. लडाखचे पर्यावरण आणि घटनात्मक अधिकारांसाठी लढा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.वांगचूक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘हा चक्रव्यूह भेदला जाईल

वांगचूक आणि त्यांचे सहकारी शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी दिल्लीत येत होते. मात्र त्यांना अडवण्यात आले. सरकारने उचललेले पाऊल अस्वीकारार्ह आहे. लडाखच्या भविष्यासाठी पुढाकार घेतलेल्या ज्येष्ठ लोकांना कशासाठी ताब्यात घेतले जात आहे?

शेतकऱ्यांसाठी रचण्यात आलेल्या चक्रव्युहाप्रमाणे हा चक्रव्यूह देखील तुटेल आणि त्यासोबत मोदीजी तुमचा अहंकार सुद्धा तुटेल. तुम्हाला लडाखचा आवाज ऐकावा लागेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. लडाखचे लोक लोकशाही मार्गाने त्यांचा अधिकार मागत आहेत. त्यात गैर काय आहे? अशी विचारणा ‘आप’ नेत्या व दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केली. वांगचूक यांना अडवणे ही हुकूमशाही आहे, असे त्या म्हणाल्या.

आप नेते अरविंद केजरीवाल प्रतिक्रिया देताना म्हणाले की, दिल्लीत येऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अडवले जाते. आता लडाखच्या लोकांना अडवण्यात आले. दिल्ली कोणाच्या बापाची मालकीची आहे का? दिल्ली ही देशाची राजधानी आहे व याठिकाणी येण्याचा सर्वांना अधिकार आहे. कोणत्याही शस्त्राशिवाय राजधानीत येणाऱ्या लोकांची सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे का? वांगचूक यांना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पाठिंबा दिला आहे.

वांगचूक यांना असंवैधानिक व बेकायदापणे पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला. सहाव्या अनुसूचीनुसार लडाखला विशेष दर्जा दिला जावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या लोकांवर कारवाई करणे गैर आहे.

पर्यावरणदृष्ट्या लडाख संवेदनशील आहे. मात्र आपल्या मित्राचा फायदा करून देण्यासाठी पंतप्रधान लडाखचे शोषण करण्यास परवानगी देत असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ‘आप’ नेते मनीष सिसोदिया यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्री आतिशी यांना पोलिसांनी रोखले

मुख्यमंत्री आतिशी यांना पोलिसांनी वांगचूक यांची भेट घेण्यापासून रोखले. लडाख आणि दिल्लीमधील नायब राज्यपालांचा हस्तक्षेप थांबला पाहिजे. पोलिस अधिकाऱ्यांना दिल्लीच्या नायब राज्यपालांचा फोन आला असेल, त्यामुळे मला वांगचूक यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले, असे आतिशी यांनी सांगितले.

तिकडे वांगचूक यांना लवकर सोडण्याचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेतली जाईल, असे मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायाधीश तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.