Amit Shah advice to party workers in view of the Maharashtra Assembly elections 2024 PPK
Marathi October 02, 2024 04:24 PM


आपल्या विचारांचे मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरवा. आपले मतदान 10 टक्क्यांनी वाढल्यास विजय आपलाच आहे, अशा सूचना देत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शहा यांनी मंगळवारी (ता. 01 ऑक्टोबर) भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयशाने आलेली निराशा झटका आणि कामाला लागा. प्रत्येक बूथवर किमान 20 लोकांना भाजपाचे सदस्य करा. प्रत्येक बूथवर आपले 10 कार्यकर्ते हवे आहेत. या कार्यकर्त्यांना दसऱ्यापासून विधानसभा निवडणूक प्रचार संपेपर्यंत कामात व्यग्र ठेवा. आपल्या विचारांचे मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरवा. आपले मतदान 10 टक्क्यांनी वाढल्यास विजय आपलाच आहे, अशा सूचना देत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शहा यांनी मंगळवारी (ता. 01 ऑक्टोबर) भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत शहा यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचे स्वबळावर सरकार आणण्याचे लक्ष्य कार्यकर्त्यांना दिले. (Amit Shah advice to party workers in view of the Maharashtra Assembly elections 2024)

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने अमित शहा यांनी आपले लक्ष आता महाराष्ट्रावर केंद्रित केले आहे. भाजपाची निवडणूक रणनीती तसेच महायुतीतील जागावाटप यात अमित शहा यांची कळीची भूमिका आहे. गेल्या आठवड्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अमित शहा हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी दादरच्या योगी सभागृहात भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला.

– Advertisement –

जे सरकार काम करत तेच सरकार पुन्हा निवडणुक जिंकते. त्यामुळे देशात आपण सलग तिसरे सरकार बनवू शकलो. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्वेक्षणाचा विचार करू नका. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा ठाम आत्मविश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात सत्ता आल्यास देशात समान नागरी कायदा आणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असेही शहा म्हणाले.

हेही वाचा… Maha Politics : मविआत 78 जागांवरून वाद, दसऱ्यापर्यंत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न

– Advertisement –

महाराष्ट्राची निवडणूक ही देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. त्यासाठी महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवा. मतदान वाढले तर विजय महायुतीचाच होईल. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही. आपल्याविरुद्ध आपल्या नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या विरोधात जनतेत असलेली नाराजी दूर करा. प्रत्येक निवडणूक बूथवर आपल्याला 10 कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील. या कार्यकर्त्यांनी आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवावे. प्रत्येक बूथवर किमान 20 लोकांना भाजपाचे सदस्य करा. सदस्य करताना मत मागू नका. सदस्य झाल्यावर त्यांना आपसूक मतदानाचे महत्त्व कळेल, असे शहा म्हणाले.

भाजपा हा पक्ष राज्य करण्यासाठी सत्तेत नाही तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत आहे. राम मंदिर, जम्मू काश्मीरमधून कलाम 370 हटविणे हे काम करण्यासाठी भाजपा सत्तेत आली. भाजपाचे सरकार आल्यानंतर गेल्या 10 वर्षात दहशतवाद आणि नक्षलवाद गाडला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे, असेही शहा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण केले. राज्यातील लोकसभेच्या सहा जागा अशा आहेत, जिथे एका लोकसभेच्या पाच विधानसभा मतदारसंघात आपल्याला बहुमत आहे. पण एका ठिकाणी विरोधक बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ सहापैकी पाच विधानसभा आपण जिंकू तर ते एकच जिंकतील, असेही अमित शहा म्हणाले.


Edited By Poonam Khadtale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.