बाबर आझमने दुसऱ्यांदा कर्णधारपदावर सोडलं पाणी, चाहत्यांना सरळ सांगितलं की…
GH News October 02, 2024 06:16 PM

पाकिस्तान क्रिकेटची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, कोणीही यावं आणि पराभूत करून जावं अशी आहे. पाकिस्तानला बऱ्याच अपेक्षा असलेल्या बाबर आझमचा फॉर्म पूर्णपणे गेलेला आहे. त्यात कर्णधारपदाचा भार त्याच्या खांद्यावर होता. त्यामुळे सर्वच बाजूने टीकेचा धनी ठरत होता. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर बाबर आझमने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावर व्हाइट बॉल क्रिकेटचं कर्णधारपद सोपण्यात आलं होतं. पण गेल्या काही दिवसात पाकिस्तान क्रिकेटमध्ये बरंच काही घडत आहे. संघात दोन गट असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. असं असताना बाबर आझमने पुन्हा एकदा वनडे आणि टी20 क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. कर्णधारपद सोडल्याची माहिती बाबर आझमने रात्री सोशल मीडियावर दिली. कर्णधारपद सोडताना त्याने लिहिलं की, फलंदाजी आणि खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी असा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर एक खेळाडू म्हणून संघाला योगदान देणार असल्याचं सांगितलं आहे.

बाबर आझमने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘प्रिय चाहत्यांनो, आज मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची बातमी शेअर करत आहे. मी आज निर्णय घेतला आहे की पाकिस्तान क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडायचं. मी तात्काळ कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी पाकिस्तान संघाचं कर्णधारपद भूषवणं सन्मानाची बाब राहिली आहे. कर्णधारपदाच्या काळात मला बरंच काही शिकता आलं. पण, आता मला वाटतं की कर्णधारपद सोडण्याचं ही योग्य वेळ आहे.’

‘मी आता माझी फलंदाजी आणि खेळावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे. म्हणून मी कर्णधारपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला. आता कर्णधार नाही तर एक खेळाडू म्हणून संघासाठी आपलं योगदान देऊ इच्छित आहे.’, असंही बाबर आझमने पुढे सांगितलं आहे. मध्यरात्री 12 वाजता बाबर आझमने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. आता पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या संघाचं कर्णधारपद शान मसूदकडे आहे. दुसरीकडे, बाबर आझमनंतर वनडे आणि टी20 संघाचं कर्णधारपद कोणाकडे सोपवावं हा पीसीबीपुढे प्रश्न आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.