हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
जयदीप भगत, बारामती October 03, 2024 12:13 AM

पुणे : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेणार अशी चर्चा सुरू असतानाच आता एक नवी अपडेट समोर आली आहे. महायुतीचे जागावाटप होईपर्यंत हर्षवर्धन पाटील कोणताही निर्णय घेणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळणार असल्याचे अजित पवारांनी संकेत दिले होते. 

हर्षवर्धन पाटील पक्षश्रेष्ठींशी बोलूनच पुढील निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2019 साली आघाडीतून तिकीट मिळाले नव्हते म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये हर्षवर्धन पाटील प्रवेश करणार असल्याची इंदापूरमध्ये चर्चा आहे. 

शरद पवार कुणाला संधी देणार?

इंदापुरातून शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर विधानसभा लढण्यासाठी भाजपाचे हर्षवर्धन पाटील इच्छुक असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र  आयात उमेदवाराला संधी देऊ नये असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरल्यानं शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता वाढली आहे.  इंदापुरातील पदाधिकाऱ्यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. इंदापुरातून लढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सहा जण इच्छुक आहेत. आता शरद पवार त्यांच्यापैकी एकाच्या हाती तुतारी देणार की हर्षवर्धन पाटलांना संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.