तुळजा भवानी मंदिरात तयारी जोरात नवरात्रीनिमित्त विविध कामांना वेग
esakal October 03, 2024 01:45 AM

आकुर्डी, ता.२ : नवरात्र म्हटले की देवीचा जागर, तिची आराधना, दांडिया, गरबा हे सगळं आलेच. याच नवरात्रोत्सवाला उद्या (गुरुवार) पासून सुरूवात होत आहे. नवरात्रीच्या जय्यत तयारी सुरू असल्याने अनेक मंदिरामध्ये रंगरंगोटी, स्वच्छ्ता आणि सजावटीचे काम सुरू आहे. या अनुषंगाने मंदिरांमध्ये कामांना वेग आलेला आहे.
आकुर्डीमधील तुळजा भवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मंदिरात यावर्षी रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचसोबत मंदिरात रोषणाई देखील करण्यात आली आहे. नवरात्रीमध्ये मंदिरात नऊ दिवस भाविकांची अलोट गर्दी असते. त्यामुळे, मंदिरांत दर्शन रांगा तयार करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय यावर्षी उन्हाचा तडाखा जास्त असल्याने परिसरात मंडप देखील टाकण्यात आले आहे.
मंदिराच्या परिसरात वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून सुरक्षारक्षक आणि बॅरिकेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रीमधील नऊ दिवस पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे, असे श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.