व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मुदतवाढ
esakal October 03, 2024 01:45 AM

पुणे, ता. २ : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्था स्तरावरील ‘नॉन कॅप’ प्रवेश प्रक्रियेतून अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, व्यवस्थापन अशा विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ही मुदतवाढ मिळाली आहे.

याबाबतचे परिपत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रसिद्ध केले आहे. तंत्रशिक्षण परिषदेने दिलेल्या या मुदतवाढीमुळे विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळाला आहे. संस्थास्तरावरील प्रवेश फेरी असल्याने मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी जागरूक राहून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ संचलित आणि खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या आणि द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनंतर (कॅप) रिक्त राहिलेल्या जागा आणि संस्थास्तरावरील कोट्यामधील रिक्त जागांच्या प्रवेश प्रक्रियेकरिता ‘नॉन कॅप’ नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येते.
प्रवेश प्रक्रियेच्या कॅप व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करणे या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत सुरू ठेवल्या जातील. ‘कॅप’नंतर रिक्त राहिलेल्या जागा आणि संस्था स्तरावरील रिक्त जागांकरिता प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांना ई-स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष पडताळणी स्क्रुटिनी पद्धत याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संस्थेमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी संस्था पातळीवर संस्थेद्वारे तयार केली जाईल. प्रवेशासाठी पात्रता नियम आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे, असे परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

‘विद्यार्थ्यांचा विचार केलेला नाही’
‘‘सीईटी सेलने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ दिली असली तरीही प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचा विचार केलेला नाही. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतला असता तर या मुदतवाढीचे स्वागत केले असते. मात्र, सीईटी सेलने हा निर्णय घेताना संस्थांचे हित जोपासले आहे. या संपूर्ण प्रकरणात सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण संचालनालयाची भूमिका संशयास्पद आहे. विद्यार्थी आणि पालकांनी जागरूक राहून प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवावा,’’ असे मत युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी व्यक्त केले आहे.

‘नॉन कॅप’अंतर्गत अशी असेल प्रवेश प्रक्रिया
अभ्यासक्रमाचे नाव : प्रवेशासाठी अंतिम मुदत/डेटा अपलोड करण्याची अंतिम मुदत
एमई/एम.टेक, एमबीए/एमएमएस : २३ ऑक्टोबर
एम.आर्च : २१ ऑक्टोबर
बीई/बी.टेक, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी : २३ ऑक्टोबर
बी.आर्च : २१ ऑक्टोबर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.