थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार
Marathi October 03, 2024 12:24 AM

अहमदनगर : उत्तर प्रदेश राज्यात साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून हटविण्यात आल्याने हिंदू-मुस्लीम भाविकांकडून निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील शिर्डी येथे साईबाबांचे जगप्रसिद्ध मंदिर आहे, जगभरातून भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. हिंदू, मुस्लीम बांधवांसह सर्वधर्मीय भाविकांची मोठी गर्दी शिर्डीत असते, सबका मालिक एक हे ब्रीद, ही शिकवण साईबाबांनी (Saibaba) दिली आहे. त्यामुळेच, साईबाबांच्या मूर्ती हटवल्यानंतर हिंदू व मुस्लीम भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. वाराणसी येथे सनातन सरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मंदिरातील साईबाबांचा फोटो आणि मूर्ती हटवल्याने नविन वाद उफाळुन आलाय. त्यानंतर, तेथे जवळपास 18 हून अधिक मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवण्यात आलीय. हिंदू धर्म शास्त्रात साईबाबांची पुजाविधी नाही, त्यामुळे साईंची पुजा करू नये अशी मागणी सनातन रक्षक दलाची आहे. या घटनेमुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केलीय. तर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झालीय.

अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांच्या मूर्ती हटवणे ही दुर्देवी घटना असल्याचे सांगत याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी स्वत: चर्चा करणार असल्याचे सांगितले. तर, साईबाबा जाती धर्माच्या पलीकडचे देव आहेत, मूर्ती हटविण्याची ही घटना दुर्दैवी असल्याचं कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री अमित शाहांना बोलणार – विखे पाटील

अहमदनगरचे पालकमंत्री तथा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वाराणसी येथे साई मूर्ती हटवल्या त्याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. साईंच्या मुर्त्या हटवण्याची घटना दुर्दैवी आहे. याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मी स्वत: बोलणार आहे. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेतही बोलणार असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं. निश्चितच त्यातून हा प्रश्न सुटण्यास मदत होईल, कोणत्याही मूर्तीची विटंबना करणे हे आपल्या संस्कृतीला धरून नाही. वाराणसीत हे होणे याचं मनस्वी दुःख आहे, असेही विखे पाटील यांनी म्हटलं.

राज्यघटनेला अपेक्षित देव – थोरात

शिर्डीचे साईबाबा कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. साईदर्शनाने लोकांना आत्मिक शांती लाभते. साई मंदिरात धर्मनिरपेक्षता असून साईबाबा जाती धर्माच्या पलीकडचे देव असल्याचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. काही ठिकाणी मूर्ती हटवण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून हा धर्माचा अतिरेक आहे. काही लोकांना चातुवर्ण आणि मनुस्मृती पुन्हा आणायची आहे. साईबाबा म्हणजे राज्यघटनेला अपेक्षित देव आहेत. हिंदू असणे वेगळे आणि हिंदुत्ववादी असणे हे वेगळं आहे. देशाला पुन्हा अंधार युगाकडे नेण्याचा हा प्रयत्न चालल्याचं थोरात यांनी म्हटलं. तर, देशभरात अशा अनेक प्रवृत्ती असतात अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असे मत क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा

हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.