Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कार्यकर्त्यांना 'हा' कानमंत्र, मित्रपक्षांना..
esakal October 03, 2024 09:45 AM

Latest Mumbai News: ‘आता मित्रांना जिंकवा, ते हरले तर सत्ता येईल का, ’ असा सवाल कार्यकर्त्यांना करीत ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२९ च्या निवडणुकीत स्वबळावर लढून एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार बोलून दाखविला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. जागावाटपामुळे अस्वस्थ असणाऱ्या कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला देत त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान

१० टक्के मते वाढविण्याचे आवाहन केले.

‘महाराष्ट्रातील सत्ता राखण्याचे आव्हान महायुती सक्षमपणे पेलू शकेल,’ असा विश्वास जागविताना कार्यकर्त्यांना मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन शहा यांनी केले. काँग्रेस देशभर सातत्याने पराभूत होत असताना विजयी होण्याचा दावा करीत आहे, त्याकडे लक्ष न देता भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी नमूद केले. शहा यांनी आज दोन वेगवेगळ्या बैठकांमध्ये भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली.

या बैठकांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा संदेश दिला. ‘‘सलग तीन वेळा सत्तेत परत येण्याची किमया नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मोदी हेच या देशाचा स्वर असून आजही देशास त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. काँग्रेसला आपली टिंगल करायची आहे. आता यापुढेही महाराष्ट्रात आपली सत्ता येईल, पण मित्रपक्षांना सोबत ठेवणेही गरजेचे आहे त्यामुळे त्यांच्याही मतदारसंघात आपलेच उमेदवार

आहेत, हे लक्षात ठेवून कामाला लागा. मतांची टक्केवारी वाढवा,’’ असे शहा म्हणाले.

वाटचालीचा आलेख मांडला

शहा यांनी आज मुंबई आणि कोकण या भागांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख रावसाहेब दानवे आणि सर्व प्रमुख नेते हे या दोन्ही मेळाव्यांना उपस्थित होते. शहा यांनी भविष्यातील वाटचालीचा आलेखच सादर केला.

... म्हणून हिरवे झेंडे नाचतात

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळणारी मराठी आणि हिंदू मते कमी झाली आहेत त्यामुळे आता त्यांच्या सभेत मते मिळावीत यासाठी हिरवे झेंडे नाचत असल्याचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आपल्या सरकारने विविध योजनांद्वारे ३ कोटी जनतेला सेवा पुरविल्या आहेत. ते लाभार्थी समोर आले तरी मतपेटीत आपण यशस्वी ठरू मात्र अतिआत्मविश्वासापासून दूर राहायला हवे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

सर्व मतदारसंघात काम करा

महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे सूतोवाच शहा यांनी केले. राम मंदिराची उभारणी, रद्द केलेले ३७० वे कलम आदींचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातील वातावरण महायुतीला अनुकूल आहे, त्यानुसारच आपल्याला निवडणुका लढायच्या आहेत. आपण मतटक्का वाढविला, तर विजय अधिकच प्रभावी होईल, असे शहा यांनी नमूद केले. महाराष्ट्राचे सरकार सांभाळायला उपमुख्यमंत्री फडणवीस समर्थ आहेत. कार्यकर्त्यांनी केवळ मतदारांशी संपर्क ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.