'केंद्र आदिवासींच्या विकासासाठी कटिबद्ध'; झारखंडमध्ये ८३ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
esakal October 03, 2024 10:45 AM

हजारीबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमध्ये ८३,७०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत महात्मा गांधी यांची आदिवासी समुदायाबद्दलची दूरदृष्टी ही आमची संपत्ती असल्याचे प्रतिपादनही त्यांनी गांधी जयंतीचै औचित्य साधत केले.

मोदी यांनी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचे उद्घाटनही केले. या अभियानांतर्गत ७९, १५० कोटी रुपये खर्चून देशातील आदिवासी समुदायाचा सर्वसमावेशक विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जुआल ओराम, अन्नपूर्णा देवी, संजय सेठ, झारखंडचे राज्यपाल संतोषकुमार गंगवार आदी या वेळी उपस्थित होते मोदी या वेळी म्हणाले,‘‘ महात्मा गांधी यांची आदिवासी समुदायाबद्दलची दूरदृष्टी आमची संपत्ती आहे.

आदिवासी समुदायाचा विकास होईल, तेव्हाच देशाचा विकास होईल. केंद्र सरकारचे आदिवासी विकासाला प्राधान्य असून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत देशातील ६५ हजार गावांचा विकास करण्यात येईल. त्यामुळे, दुर्गम आदिवासी खेड्यातही आता विकासाची किरणे पोचत आहेत.’’

पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियानातंर्गत १, ३६० कोटींच्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यात १,३८० किमीचे रस्ते, १२० अंगणवाडी केंद्रे, २५० बहुउद्देशीय केंद्रे आणि १० शालेय वसतिगृहांचा समावेश आहे.

७५ हजार घरांचे विद्युतीकरण

मोदी यांनी सुमारे तीन हजार गावांत विशेषतः: असुरक्षित आदिवासी गटांच्या ७५,८०० घरांचे विद्युतीकरण करण्याची घोषणाही केली. येत्या जानेवारीत विधानसभेची मुदत संपणाऱ्या झारखंडमध्ये गेल्या १५ दिवसांत पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा दौरा होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.