Stock Market: शेअर बाजारामुळे गुंतवणूकदार मालामाल; यावर्षी केली 11,05,76,17,00,00,000 रुपयांची कमाई
esakal October 03, 2024 05:45 PM

Stock Market: देशांतर्गत शेअर बाजार या वर्षात आतापर्यंत तेजीत आहे. या कालावधीत प्रमुख निर्देशांकांनी सातत्याने नवीन विक्रमी पातळी गाठली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 110.57 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. या वर्षात आतापर्यंत, BSE कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात (मार्केट कॅप) 1,10,57,617.4 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कंपन्यांचे एकूण भांडवल वाढून 4,74,86,463.65 कोटी (5.67 लाख कोटी डॉलर) झाले आहे.

बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 27 सप्टेंबर रोजी 477.93 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. त्याच दिवशी सेन्सेक्सने 85,978.25 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली. बीएसई सेन्सेक्सने 2024 मध्ये आतापर्यंत 12,026.03 अंक किंवा 16.64 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. वर्षाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 72,271.94 अंकांच्या पातळीवर होता.

या तेजीचा फायदा गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याच्या रूपाने झाला आहे. विश्लेषकांनी बाजारातील वाढीचे श्रेय भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजी आणि देशांतर्गत तरलतेच्या चांगल्या परिस्थितीला दिले आहे.

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) विक्रीचा दबाव असूनही, भारतीय इक्विटी बाजार विक्रमी उच्चांक गाठण्यात यशस्वी ठरले. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली. अनेक शेअर्सनी उच्चांक गाठल्याने किरकोळ गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला.

या वर्षी आतापर्यंत बीएसई मिडकॅप निर्देशांक 12,645.24 अंकांनी किंवा 34.32 टक्क्यांनी वाढला आहे आणि स्मॉलकॅप निर्देशांक 14,777.09 अंकांनी किंवा 34.62 टक्क्यांनी वाढला आहे.

मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे म्हणाले, अलिकडच्या आठवड्यात झालेली तीव्र वाढ फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याचा परिणाम आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या द्विमासिक आढावा बैठकीतही असेच पाऊल उचलेल अशी अपेक्षा आहे.

बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 17 सप्टेंबर रोजी प्रथमच 83,000 च्या वर बंद झाला. फक्त तीन दिवसांनंतर, तो प्रथमच ऐतिहासिक 84,000 च्या वर बंद झाला. 25 सप्टेंबर रोजी त्याने 85,000 चा टप्पा ओलांडला.

भू-राजकीय ताणतणाव असूनही जागतिक बाजारपेठाही या वाढीसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी अमेरिकेतील व्याजदर कपातीचे चक्र एक महत्त्वपूर्ण सकारात्मक घटक आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना वाढल्या आहेत आणि धोकादायक मालमत्तेमध्ये तरलता वाढली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वात मौल्यवान कंपनी

2023 मध्ये सेन्सेक्सने 11,399.52 अंकांची किंवा 18.73 टक्क्यांनी झेप घेतली होती. या काळात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 81.90 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी कंपन्यांचे बाजारमूल्य प्रथमच चार ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असून तिचे बाजारमूल्य 19,82,265.88 कोटी रुपये आहे. TCS (15,50,820.85 कोटी), HDFC बँक (14,48,480.85 कोटी), भारती एअरटेल ( 9,67,295.41 कोटी) आणि ICICI बँक (8,98,320.22 कोटी) देखील पहिल्या पाचमध्ये आहेत.

शेअर बाजारात पुढे काय होऊ शकते?

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर दबाव निर्माण झाला आहे. देशांतर्गत बाजारपेठही यापासून दूर राहणार नाही. याशिवाय अलीकडेच चीनने आपली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत.

यामुळे पैसा भारतीय बाजारातून बाहेर पडून चिनी बाजाराकडे जाऊ शकतो. गेल्या काही सत्रांतील बाजारातील नरमाईमागे हे घटक होते. मूल्यांकनाबाबतही चिंता आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. शेअर बाजारासाठी हे सकारात्मक संकेत आहे. मोठ्या प्रमाणात देशांतर्गत गुंतवणूकदार बाजारात आले आहेत. यामुळे बाजारात मोठी घसरण टाळता येईल. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावरील घडामोडींवर मुख्यत्वे पुढील मार्ग निश्चित केला जाईल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.