Irani Cup: Abhimanyu Easwaranचा धमाका, सलग तिसरी शतकी खेळी
GH News October 03, 2024 07:15 PM

ईराणी कप स्पर्धेत मुंबईच्या सर्फराज खान याने नाबाद द्विशतकी खेळी केली. त्यानंतर आता रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू इश्वरन याने शतक केलं आहे. अभिमन्यू याने मुंबई विरुद्ध तिसऱ्या दिवशी 117 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. रेस्ट ऑफ इंडियाची फार वाईट सुरुवात झाली. कॅप्टन ऋतुराज गायकवाड 9 धावा करुन माघारी परतला. तर साई सुदर्शन याला 32 धावाच करता आल्या. देवदत्त पडीक्कल याने 16 धावांचंच योगदान देता आलं. मात्र अभिमन्यूने एक बाजू लावून धरली आणि शतक पूर्ण केलं. अभिमन्यूच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे 26 वं शतक ठरलं. अभिमन्यूने या खेळीसह शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. अभिमन्यूने याआधी नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये शतक केलं होतं.

अभिमन्यू सातत्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करतोय. मात्र अभिमन्यूची कसोटी पदार्पणाची प्रतिक्षा संपलेली नाही. अभिमन्यूची अनेकदा संघात निवड करण्यात आली आहे. मात्र अभिमन्यूवर विश्वास दाखवून त्याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मात्र अभिमन्यूने आता शतकी हॅटट्रिकसह आपला दावा आणखी मजबूत केला आहे. त्यामुळे बीसीसीआय निवड समिती अभिमन्यूला न्यूझीलंड विरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संधी देते का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अभिमन्यू इश्वरनची शतकांची हॅटट्रिक

सर्फराजचं नाबाद द्विशतक

दरम्यान सामन्यातील पहिल्या डावात मुंबईने सर्फराज खान याच्या नाबाद द्विशतकी खेळीच्या जोरावर 500 पार मजल मारली.मुंबईने सर्वबाद 537 धावा केल्या. मुंबईकडून सर्फराज खान याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सर्फराजने 286 चेंडूत 4 षटकार आणि 25 चौकारांच्या मदतीने नाबाद 222 धावा केल्या. सर्फराज व्यतिरिक्त कर्णधार अजिंक्य रहाणे याने 97 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 57 आणि तनुष कोटीयनने 64 धावा जोडल्या.

मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.

रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.